येत्या २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सोलापूरच्या संभाव्य दौऱ्याची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. त्यासाठी आयोजिलेल्या एका आढावा बैठकीत या दौऱ्याशी निगडित संबंधित विभागप्रमुखांवर आपापली जबाबदारी गांभीर्याने व चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी दिल्या.
सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजिलेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, सोलापूर महापालिकेचे आयुक्त अजय सावरीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदींची उपस्थिती होती. याशिवाय सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा पंढरपूर अर्बन बँकेचे प्रमुख प्रशांत परिचारक, काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुनील भडकुंबे आदींनी बैठकीत चर्चा केली. राष्ट्रपतींच्या संभाव्य दौऱ्यात कोणतीही कसर राहू नये, याची पुरेपूर दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मवारे यांनी दिल्या.
२९ डिसेंबर रोजी मुखर्जी हे सोलापूर व पंढरपूरच्या संभाव्य दौऱ्यावर येत आहेत. सोलापुरात डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृह व कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याचे आयोजिले आहे. याशिवाय पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन व पंढरपूर अर्बन बँकेच्या शतक महोत्सवाचे उद्घाटनासाठी राष्ट्रपती येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा