शहरातील लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत मुनोत व लायनेस क्लबच्या अध्यक्ष अमोल ससे यांच्यासह नव्या पदाधिका-यांनी नुकतेच पदग्रहण केले. उत्तराखंडातील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेने १ कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती संटनेचे उपप्रांतपाल विक्रांत जाधव यांनी या वेळी दिली.
जाधव यांच्या हस्तेच पदग्रहण झाले. अध्यक्षस्थानी अरविंद पारगावकर होते.
जाधव यांनी सुरुवातीला संघटनेचे ब्रीदवाक्य ‘वुई सर्व्ह’ची शपथ दिली. ते म्हणाले, लायन्स परिवार ही जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. केवल सदस्य संख्येमुळे संघटनेला हा बहुमान मिळालेला नाही. सामाजिक कार्यातील सेवाभावी सहभाग हेच त्याचे कारण आहे. याचेच भान सदस्यांनी सतत ठेवले पाहिजे.
जाधव यांच्या हस्ते या वेळी माजी अध्यक्ष अरविंद पारगावकर व अंजली कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. नगर येथील कार्याचे त्यांनी कौतुक केले. विपुल शाह, सविता तागडे (सचिव) व संतोष मानकेश्वर, विशाखा पटेल (खजिनदार) यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी या वेळी पदग्रहण केले. मुनोत यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर वर्षभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. शहरात शीत शवपेटी व आर्थोपेडिक साहित्याची लायब्ररी सुरू करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.  ससे यांनी महिला सबलीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. माजी महापौर भगवान फुलसौंदर, महेश चांडक, संजय ओक, अनघा पारगावकर, साधना कोठारी आदी या वेळी उपस्थित होते.