लोकसभा निवडणुका होताच या जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी चंद्रपूर येथे केली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व रिपाइं आघाडीचे उमेदवार संजय देवतळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. व्यासपीठावर काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय देवतळे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुषाभ धोटे, एस.क्यू झामा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.
या औद्योगिक जिल्ह्य़ातील दारूबंदीचा प्रश्न राज्य शासनाने अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. त्यामुळेच देवतळेंसारख्या जनतेशी प्रामाणिक असलेल्या पालकमंत्र्यांची अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. देवतळे समितीने दारूबंदीचा मुद्देसूद सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. हा अहवाल आपण स्वत: बघितला असून लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच या जिल्ह्य़ात दारूबंदीचा सकारात्मक निर्णय घेऊ, अशी घोषणा चव्हाण यांनी करताच सभेला उपस्थित महिलांनी या निर्णयाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावेळी चव्हाण यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देतानाच स्थानिक खासदार दहा वर्षांंपासून केंद्र व राज्यात काँग्रेस आघाडीने सरकार असताना सर्व सकारात्मक निर्णय आपण स्वत:च घेतल्याचा खोटा आव आणत सांगत आहेत. विशेषत: हे सर्व निर्णय काँग्रेस आघाडीचे आहेत, असेही चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. राज्याचे सांस्कृतिक व पर्यावरण मंत्री, तसेच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री म्हणून देवतळे यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. सर्वाधिक प्रदूषित जिल्ह्य़ातील पर्यावरण सांभाळत त्यांनी येथे औद्योगिकीकरण केले. विदर्भ औद्योगिकीकरणात मागासला, हे वास्तव मान्य करून नागपुरात मिहान प्रकल्प सुरू केला. आज टाटा व इन्फोसीस सारख्या मोठय़ा कंपन्या तेथे आल्या आहेत, असे ते म्हणाले.
देशात दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटींची मदत देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. औद्योगिकीकरण व विदेशी गुंतवणुकीत सुध्दा महाराष्ट्र गुजरातच्या पुढे आहे. जाहिरातबाजी, मार्केटिंग, पैशाचा मारा व काही उद्योगपतींच्या बळावर मोदींनी फुगविलेला फुगा छोटय़ा टाचणीने फुटणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.