व्याजाच्या माध्यमातून नफ्याचा विचार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा देशातील ऊर्जा नियोजनात वाढलेल्या हस्तक्षेपामुळे अक्षय ऊर्जेचा प्रंचड मोठा ऱ्हास होत आहे. आपल्याकडे अक्षय ऊर्जेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ऊर्जेच्या ऱ्हासाकडे आपले दुर्लक्ष होत असून उत्तराखंडातील प्रकोप हा त्याचा परिणाम असल्याचे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी ठाण्यात केले.
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांच्या ‘हाय पॉवर’ या लघुपटाला ‘यलो ऑस्कर’ मिळाला तसेच संजय मंगो यांनी ऊर्जेच्या क्षेत्रात केलेल्या अभ्यासाबद्दल या दोघांचा सत्कार करण्यासाठी ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था, सेवाधाम, संजीवन केंद्र, जाग असुरक्षित मजदूर कारागीर युनियन या संस्थांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अक्षय ऊर्जेवर व्यापक विचारमंथन करण्यात आले. यावेळी बोलताना मेधा पाटकर यांनी सध्याच्या परिस्थितीचे वास्तव मांडले. सन २०३२ पर्यंत आपणास ८ लाख मेगाव्ॉट विजेची गरज आहे असे भासवत असताना त्यातील ७ लाख मेगाव्ॉटचे नियोजन २०१३ मध्येच करण्यात आले आहे. ही उर्जा थर्मल ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणार आहे. आपल्याकडे चमचमणारी तीच ऊर्जा आणि तिथेच विकास असे चित्र निर्माण केले आहे. त्यामुळे ८ लाखच काय पण ८० लाख मेगाव्ॉट ऊर्जा निर्माण केली तरी ती आपल्या देशाला पुरणार नाही. कारण येथे आपण जी जीवनशैली स्वीकारली आहे, त्याचा विचार केल्यास आपण कधीच समाधानी होऊ शकणार नाही.
आदिवासी बांधव खऱ्या अर्थाने ऊर्जा संवर्धन करत असून विकास साधत आहेत. मात्र तरीही त्यांना मागास म्हणून हिणवले जाते तर रोज लाखो संसाधनांची राखरांगोळी करून ऊर्जा उपभोगणारे मात्र पुढारलेले म्हणून मिरवत आहेत. हे चित्र दुर्दैवी आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी जेष्ठ समाजवादी नेते गजानन खातू उपस्थित होते. त्यावेळी ठाण्यातील ऊर्जा अभ्यासाला मदत करणाऱ्या संस्थांचा यावेळी पाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.      

Story img Loader