मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वाङ्मय मंडळ उपयुक्त आहे. शिक्षकांनी मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध साहित्य निर्मितीसाठी मार्गदर्शन केल्यास अनेक साहित्यिक निर्माण होतील. विद्यार्थ्यांमध्ये विविध साहित्याचा सखोल अभ्यास करण्याची रुची निर्माण होईल, असे प्रतिपादन येथील केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित सीडीओ मेरी विद्यालयात वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी धोंडगे बोलत होते. कथा, कादंबरी व नाटय़प्रयोग आदी साहित्याची निर्मिती कशी होते याबद्दल त्यांनी माहिती दिली. ग्रंथ वाचनाने ज्ञान समृद्ध होते. ग्रंथ आपणास ज्ञान देतात तसेच जगण्याची रीतही शिकवितात. प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांनी सतत वाचन केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी कवी प्रशांत केंदळे यांनी गुलमोहर, बाप यांसह इतर कवितांचे वाचन केले. व्यासपीठावर मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी, संस्था सहकार्यवाह दिलीप अहिरे, उपमुख्याध्यापक यादव आगळे, पर्यवेक्षक मुग्धा काळकर, पूजा गायकवाड, मुक्ता सप्रे, मराठी विभागप्रमुख रंजना सूर्यवंशी व दीपाली पाटील उपस्थित होते.सायली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गीतमंचाने स्वागत केले.
पाहुण्यांचा परिचय दिलीप अहिरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक शरद शेळके यांनी केले. आभार छाया गुंजाळ यांनी मानले.

Story img Loader