मुंबई सर्वोदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे. बाबुलनाथ मंदिर चॅरिटीज् आणि महालक्ष्मी मंदिर चॅरिटीज् यांच्या सहकार्याने हुतात्मा चौक आणि गांधी बुक सेंटर येथे हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सहा दिवसांत ५ लाख १५ हजार २४७ रुपयांची विक्री झाली असून १६,५०८ पुस्तके विकली गेली. ‘महात्मा गांधी यांचे विचार’च्या ३६० प्रती, ‘माझे माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनाच्या ४,३०० प्रती, तर ‘सिलेक्टेड वर्क ऑफ महात्मा गांधी’ या पाच पुस्तकांच्या संचाच्या २४५ प्रती विकल्या गेल्या. विनोबांच्या ‘गीता प्रवचन’च्या ८५० प्रतींची विक्री झाली. प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील साहित्यालाही चांगली मागणी होती. आंबेडकरी साहित्याची ५५ हजार रुपयांची विक्री या सहा दिवसात झाली.
शब्द साहित्य संमेलन
महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनचे चौथे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन येत्या ५ ते ७ एप्रिल या कालावधीत अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात पुस्तक प्रकाशन, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, काव्य संमेलन, प्रकट मुलाखत, साहित्य क्षेत्रातील महिलांचे योगदान आदी विषयांवर विविध कार्यक्रम होणार आहेत. अधिक माहितीसाठी ९८६०२५१३६८/९४०३६२८०३२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्य अकादमीचा ‘कवी-अनुवादक’ कार्यक्रम
साहित्य अकादमीतर्फे येत्या ९ फेब्रुवारी रोजी ‘कवी-अनुवादक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजराथी साहित्यिक धीरुबेन पटेल त्यांच्या कविता सादर करणार असून उषा मेहता या कवितांचा अनुवाद सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता साहित्य अकादमीचे सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय इमारत, नायगाव, दादर (पूर्व) येथे होणार आहे.

Story img Loader