लेखक जे लिहितो त्याचा संबंध त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडणे चुकीचे नाही का, असा सवाल लेखक किरण नगरकर यांनी येथे उपस्थित केला. पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रिय रसिक’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि ‘स्टार प्लस’चे नचिकेत पंतवैद्य यांनी नगरकर आणि त्यांच्या कादंबऱ्या अनुवादित करणाऱ्या रेखा सबनीस यांची प्रकट मुलाखत घेतली.
कोणत्याही कादंबरीतील व्यक्तिरेखा कशा आहेत, त्यांचे परस्परांशी नाते कसे आहे, त्या कशा वागतात यातून त्या कादंबरीचे कथानक कसे पुढे जाते आणि ते परिणामकारक होते का, हेच महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन नगरकर यांनी केले. आपण इंग्रजीत लिहिण्यास का सुरुवात केली, कादंबऱ्यांमध्ये कथानकाच्या अनुषंगाने येणारी लैंगिकता, ‘ककल्ड’ कादंबरीचा इतिहास आदीविषयी श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. नगरकर यांच्या कादंबऱ्या मला आवडल्या म्हणून मी त्याचे मराठी अनुवाद केले, असे सबनीस यांनी सांगितले. पॉप्युलर प्रकाशनाच्या संपादक अस्मिता मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमास अभिनेते विक्रम गोखले उपस्थित होते.

Story img Loader