बिबटय़ाच्या हल्ल्यात चार वर्षांची मुलगी मृत्युमुखी पडली. तालुक्यातील बाभुळवंडी या आदिवासी खेडय़ात ही घटना घडली.
तालुक्याच्या उत्तर भागातील बाभुळवंडी येथे गावापासून उत्तरेला दोन किमी अंतरावर रामदास लक्ष्मण भवारी यांची वस्ती आहे. घरालगतच्या पडवीत त्यांची चार वर्षांची मुलगी अश्विनी झोपली होती. पहाटे तीनच्या सुमारास बिबटय़ाने अचानक पडवीत प्रवेश करीत चार वर्षांच्या अश्विनीला जबडय़ात पकडले व तिला तो घेऊन गेला. घराच्या मागच्या बाजूलाच शंभर फूट अंतरावर डोंगर आणि दाट झाडी आहे. कोणाला काही समजण्याच्या आतच बिबटय़ाने जंगलाकडे पलायन केले. ग्रामस्थांनी सकाळी तिचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. साडेआठ वाजता भवारी यांनी वन खात्याला या घटनेची माहिती दिली. उपविभागीय वनअधिकारी शिवाजी फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने जंगल िपजून काढले. दुपारी साडेबाराच्या सुमारास अश्विनीचा बिबटय़ाने अर्धवट खाल्लेला मृतदेह आणि काही कपडे बागलदऱ्याजवळच्या दरीत आढळून आले.
बाभुळवंडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाची एक मादी दोन बछडय़ांसह संचार करीत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पण आजपर्यंत बिबटय़ाकडून अलीकडच्या काळात कोणतीही उपद्रवाची घटना घडली नव्हती. या नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी बाभुळवंडी परिसरात दोन िपजरे लावण्यात आले आहेत. शासकीय नियमाप्रमाणे मृत अश्विनीच्या पालकांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती फटांगरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा