विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला विदर्भवादी नेत्यांना प्रतिसाद न मिळाल्याने या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. फॉरवर्ड ब्लॉकने विदर्भ बंदचे आवाहन केले होते. मात्र, या बंदचा फज्जा उडाला. विदर्भासह शहरातील सर्व बाजारपेठ आज नेहमीप्रमाणे सुरू असल्यामुळे कुठेही बंदचा परिणाम जाणवला नाही. शेतक ऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्साठी सरकारच्या विरोधात भाजपने आयोजित केलेल्या रस्ता रोकोला उपराजधानीत प्रतिसाद मिळाला असला तरी विदर्भात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरात कॉटेनमार्केट चौकात रस्ता रोकोमुळे काही वेळ वाहतूक खोळंबळी होती.
 विदर्भवादी संघटनांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंदचे आवाहन केले असताना आज सकाळपासून मात्र बंदचा कुठेच परिणाम दिसून आला नाही. फारवर्ड ब्लॉकसह शिवराज्य पक्ष, रिपाइं (आ), जनता दल (यू), भारतीय मुस्लिम लीग, आरपीआय सेक्युलर, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट, रिपाइं (खो), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, जनमंचने पाठिंबा जाहीर केला. मात्र, प्रत्येक संघटनेने आपापल्या पद्धतीने धरणे निदर्शने आणि रस्ता रोको आंदोलन केले. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
 फॉरवर्ड ब्लॉकचे विदर्भाचे अध्यक्ष विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांना एक दिवस आधीच पोलिसांनी एका पोलिसाला मारहाण केल्यावरून अटक केली होती. धोटे पुन्हा काही वेळाने बाहेर आले असले तरी त्यांच्यावर पोलिसांची नजर होती. एरवी धोटे यांनी विदर्भ बंदची हाक दिल्यानंतर नागपूरसह विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील बंद कडकडीत राहत होता. मात्र, आज धोटे यांच्या आवाहनाला कुठेच प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. विदर्भ जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी कार्यकर्ते या बंदमध्ये कुठेच सहभागी झालेले दिसले नाही. काही कार्यकर्त्यांंनी विधानभवन परिसरात निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले. मात्र, त्यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले.
शहरातील बाजारपेठ आणि शिक्षण संस्था नेहमीप्रमाणे सुरू होत्या. एरवी विदर्भवाद्यांनी बंदची दिलेली हाक बघता नागपुरात त्याला संमिश्र प्रतिसाद मिळत असे. मात्र, आज बंद कुठेच जाणवला नाही. फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात विखुरले असले तरी त्यांचे अस्तित्व कुठेच दिसून आले नाही. दुपारच्या वेळी मानस चौकात काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मात्र, त्यांना पोलिसांना अटक केली. सायंकाळच्या वेळी मुंजे चौकात माजी मंत्री सुलेखा कुंभारे, अहमद कादर यांनी विदर्भाची मागणी करीत रस्तारोको आंदोलन केले. मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विदर्भ संयुक्त कृती समितीने वेगळ्या विदर्भ राज्याची प्रतिरूप विधानसभा आयोजित करून व ती यशस्वी करून दाखवल्याने बंदच्या आंदोलनात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होतील, अशी अपेक्षा होती.  
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपतर्फे विदर्भात विविध ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कॉटेन मार्केट चौकात, तर आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नेतृत्वाखाली कामठीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कॉटेनमार्केट चौकात दुपारी १२ वाजेपासून रस्ता रोकोसाठी कार्यकर्ते संघटीत होऊ लागले. यावेळी सुधाकरराव देशमुख, कृष्णा खोपडे, दयाशंकर तिवारी, महापौर अनिल सोले यांची भाषणे झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करीत २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांंनी कामाला लागावे, असे आवाहन केले. रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रदेश प्रवक्ता गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, अविनाश ठाकरे, प्रवीण दटके, प्रमोद पेंडके, संदीप जोशी उपमहापौर जैतुनबी अंसारी, बंडू राऊत आदी पक्षाचे पदाधिकारी, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वर्धा- भाजपच्या आज करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनास ग्रामीण भागात लक्षणीय प्रतिसाद मिळाला, तर विदर्भ बंद आंदोलनाचा पूर्णपणे फ ज्जा उडाल्याचे दिसून आले.  देवळी, धोत्रा, वायगाव, आंजी व अन्य परिसरात भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प पडली होती. देवळीत माजी आमदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
यवतमाळ- विदर्भवाद्यांच्या बंदला व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजपाने दिलेल्या रास्ता रोको आंदोलनास जिल्ह्य़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्य़ातील शहर विभागात दुपारी २ वाजेपर्यंत सर्व व्यवहार ठप्प होते, तर अनेक ठिकाणी एक ते तीन तासपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Story img Loader