एरवी एक कुणी तरी नामवंत चित्रकार आला आणि प्रात्यक्षिक सादर करून गेला, यामध्ये जे जे स्कूल ऑफ फाइन आर्टला काही याचे नावीन्य नाही. या वास्तूने शंकर पळशीकरांपासून ते अगदी अलीकडच्या चित्रकारांपर्यंत अनेकांना पाहिले आहे.. तरीही मंगळवारचा सोहळा मात्र या वास्तूसाठीही अनोखा होता. कारण असे प्रथमच घडत होते. वासुदेव कामत, अनिल नाईक आणि सुहास बहुळकर हे देशातील तीन दिग्गज व्यक्तिचित्रकार एकाच वेळेस एकमेकांचे व्यक्तिचित्र तेही परस्परभिन्न माध्यमामध्ये चितारत होते. आणि त्यांच्यासमोर होते राज्याबरोबरच परराज्यांतूनही हा सोहळा पाहण्यासाठी आलेले कलावंत व विद्यार्थी. रंगात रंगलेले चित्रकार अन् त्यांच्या सादरीकरणात न्हाऊन निघालेले विद्यार्थी यामुळे जे जे व्यक्तिचित्ररंगी रंगले होते!
वासुदेव कामत, सुहास बहुळकर आणि अनिल नाईक हे कलाक्षेत्रातील तीन दिग्गज, तीन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करीत होते.. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ आणि चेहऱ्यावरची दाढी (त्याची ठेवणही प्रत्येकाची वेगवेगळी) यांचे साधम्र्य सोडले तर उंची, अंगकाठी अशा सर्वच बाबतीत तिघे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे. पण, मंगळवारी हे तिघे व्यक्तिचित्ररंगात रंगून गेले होते. भलेही या रंगाचे फटकारे अॅक्रेलिक, पेस्टल, जलरंग अशा वेगवेगळ्या माध्यमांतील होते. या तिघांना एकत्र आणले ते व्यक्तिचित्रण या कलाप्रकाराने. चित्रकलेच्या इतर प्रकारांमध्ये काहीशा मागे पडलेल्या ‘व्यक्तिचित्रणा’ला नवसंजीवनी देण्यासाठीच ते आपली कर्मभूमी असलेल्या ‘जे जे’च्या भूमीवर एकत्र आले होते. त्यांनी एकमेकांचे व्यक्तिचित्र साकारून एका वेगळ्या प्रयोगाची नांदीच केवळ ‘जे जे’मध्ये नव्हे तर या देशात घातली. या कलाउत्सवाचे साक्षीदार होते, राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही आलेले विद्यार्थी व शिक्षक.
‘पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप’च्या माध्यमातून आयोजिण्यात आलेल्या हा सोहळा सकाळी पावणेअकराच्या सुमारास सुरू झाला. पुढे सूर्य माथ्यावर येईपर्यंत कलेचा रंगांचा उत्सव सुरू होता. कागदावर पेन्सिलीने चित्रण केल्यानंतर त्यावरचे अॅक्रेलिक, पेस्टल, जलरंगाचे वेगवेगळ्या कोनातून मारलेले फटकारे विद्यार्थ्यांकरिता अभ्यासण्याचा भाग होते. तिघांच्या आजूबाजूला उभे असलेले माना तिरक्या करून तर मागे असलेले उंचावून हा सोहळा अनुभवत होते. या प्रात्यक्षिकाचे थेट प्रक्षेपण जे जेच्या तळमजल्यावरील मोकळ्या जागेत केले जात होते, तिथेही हेच चित्र होते. आश्चर्य म्हणजे चित्र पूर्ण झाल्यानंतर तिघांचीही त्यावर स्वाक्षरी होईपर्यंत खचखचून भरलेली ही दोन्ही सभागृहे टाचणी पडल्यानंतर आवाज व्हावा एवढय़ा निरव शांततेत या कलासोहळ्याची अनुभूती घेत होती. अर्थातच एकेक चित्र पूर्ण झाल्यानंतर ही समाधी उत्स्फू र्त टाळ्यांच्या कडकडाटाने भंग पावली.
एकदा व्यक्तिचित्रण सोडले की ते पुन्हा आपल्या हाताला गवसत नाही, असे सुहास बहुळकर या वेळी म्हणाले. भल्या भल्या व्यक्तिचित्रकारांचीही सराव गेल्यानंतर पंचाईत झाली आहे. इतर कोणत्याही चित्रणापेक्षा म्हणूनच व्यक्तिचित्रण करणारी कलावंत मंडळी कमी दिसतात. त्यात कौशल्य आणि सातत्य दोन्हींची जोड महत्त्वाची असते.
वासुदेव कामत म्हणाले की, या कर्मभूमीमध्ये चित्रण करताना शंकर पळशीकरांबरोबरच इतर दिग्गज शिक्षक तसेच चित्रकारांची आठवण होत होती. म्हणूनच सोहळ्याच्या उद्घाटनाला देवतांच्या प्रतिमा ठेवतात तद्वतच इथे दिग्गजांनी केलेली व्यक्तिचित्रे ठेवली होती. अनिल नाईक म्हणाले की, वासुदेव कामतांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपची मोहीम देशातील या अनोख्या प्रयोगानंतर आता अधिक जोमाने देशभरात पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
नोंद – वासुदेव कामत, अनिल नाईक आणि सुहास बहुळकर या तिन्ही दिग्गज कलावंतांचे चित्रणाचे प्रात्यक्षिक पाहा http://www.youtube.com/loksattalive वर
तिघांनी वेगवेगळ्या रंगांच्या प्रकारांचा वापर केला. पोट्र्रेटमधल्या या तिघांना एकत्रितपणे चित्र काढताना पाहणे हे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
शशिकांत पवार, भारती विद्यापीठ, पुणे</strong>
तीन दिग्गजांकडून एकाच वेळी व्यक्तिचित्रणाचे तीन वेगवेगळे प्रकार अनुभवता येणे हा प्रकारच भन्नाट आहे.
वैभव क्षीरसागर, ‘जे जे’चा कला विद्यार्थी
चेहऱ्यावरील छटाही बदलल्या!
कामत, बहुळकर आणि नाईक तिघांनीही चित्रण सुरू केल्यानंतर पहिल्या १०-१५ मिनिटांत फर्स्ट इअरच्या काही विद्यार्थ्यांनी टिप्पणी करण्यास सुरुवात केली. त्या वेळेस एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली की, आता काय चितारले जाते आहे, त्यावर जाऊ नका, हा बेस आहे. त्यावर चित्र आकार घेणार आहे. हळूहळू रंग, रूप, रेषा यांना छायाप्रकाशाच्या छटा लाभत जातील तेव्हा त्यातून चित्र आकारास येईल.. त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक हा प्रयोग पाहिला आणि छायाप्रकाशाच्या चित्रातील छटांबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरील छटाही बदलत गेल्या!