‘साहेब, म्या जिवंत आहे’ असा फलक घेऊन ६५ वर्षांची एक महिला बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चात दिसली, तेव्हा सारे प्रशासनच हादरले. महसूल प्रशासनातील बेरकी अशी ओळख असणाऱ्या तलाठय़ाने या महिलेला कधी मृत करून ठेवले, काय माहीत? चार महिने अनुदान मिळाले नाही म्हणून तिने चौकशी केली आणि तिला सांगण्यात आले, ‘बाई, तू मेलीस!’ ती घाबरली आणि तहसीलदाराला म्हणाली, ‘साहेब, मी जिवंत आहे.’
‘जे न असे ललाटी, ते करे तलाठी’ ही म्हण बीड तालुक्याच्या रुई गावच्या तलाठय़ाने अक्षरश: खरी करून दाखविली. ६५ वर्षांच्या सकुबाई लक्ष्मण साळुंके यांना सरकारी दरबारी मृत नोंदविण्यात आले. त्यामुळे निराधार योजेनेतून महिन्याला मिळणारे तिचे अनुदान बंद झाले. त्यानंतर तहसील कार्यालयात ती चार महिने खेटे मारत होती. यंत्रणा तिला जिवंत मानायलाच तयार नव्हते. अखेर शुक्रवारी निराधारांच्या मोच्र्यात ही महिला ‘म्या जिवंत आहे’, असा फलक डोक्यावर घेऊन आली. तेव्हा महसूल यंत्रणेच्या कारभाराने सारेच अवाक झाले.
बीड तालुक्यातील शासनाच्या अनुदानाच्या योजनेतील अधिकारी व तहसील कार्यालयातील भ्रष्ट कारभारमुळे  लाभार्थ्यांंकडे पैशांची मागणी करून मानसिक त्रास देतात. शुक्रवारी विविध मागण्यांसाठी हे लाभार्थी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. सहा महिन्यांपूर्वी रुई येथील तलाठय़ाने तहसीलला पाठविलेल्या अहवालात अनेक वर्षांंपासून अनुदान उचलणारी सकुबाई लक्ष्मण सांळुके या महिलेला चक्क मृत दाखविले. परिणामी तहसीलदारांनी अनुदान बंद केले. चार महिन्यांपूर्वी बँकेतून महिन्याचे अनुदान मिळत नसल्याने ही  महिला तहसील कार्यालयात आली. पण पंधरा दिवस तर कुणी भेटलेच नाही. अखेर एका संघटनेच्या कार्यकर्त्यांला सांगून अनुदान बंद का झाल्याची माहिती घेतली. तेव्हा या महिलेला धक्काच बसला. शेवटी जिवंत आहे, हे दाखविण्यासाठी तिला फलक दाखवावे लागले.

Story img Loader