* शासनाला दाखविण्यासाठी जलमापकाप्रमाणे पाणी दर आकारणीचा देखावा
* नगरसेवक, पदाधिकारी अंधारात
* नागरिकांच्या नगरसेवक, पालिका कार्यालयासमोर रांगा
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांना गेले तीन वर्षांत पाणी वापराची नियमितपणे देयके भरूनही आता नव्याने पाच हजारांपासून ते साठ हजार रुपयांपर्यंत फरकाची पाणी देयके पालिकेने पाठविल्याने खळबळ उडाली आहे. सर्वसाधारण सभेने पाणी दरवाढ न करताही ही पाण्याची वाढीव देयके आम्ही का भरायची, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे.
२०१० ते फेब्रुवारी २०१३ पर्यंत रहिवाशांनी प्रस्तावित ९० रुपये पाणी दराप्रमाणे पालिकेला पाणी देयक भरणा केला आहे. तरीही याच कालावधीत जलमापकाप्रमाणे रहिवाशांनी पाणी वापरल्याची सरासरी आकाराची पाणी देयके पालिकेने रहिवाशांना पाठविली आहेत. ही वाढीव देयके कसली याची विचारणा करण्यासाठी नागरिकांनी पालिकेसमोर रांगा लावल्या आहेत. पालिकेने कोणतीही पाणी दरवाढ केली  नसताना अचानक प्रशासनाने ही वाढीव दराची पाणी देयके पाठविल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना अद्याप याविषयीची खबरच नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
पालिकेतील विश्वसनीय सूत्राने सांगितले, पालिका प्रशासनाने जवाहरलाल नेहरू अभियान पुनरूत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणला आहे. हा निधी आणण्यापूर्वी पालिकेने केंद्र व राज्य शासनाला आम्ही पालिका हद्दीत जलमापकाप्रमाणे पाणी देयके पाठवून महसूल जमा करू असे हमीपत्र दिले आहे. या हमीपत्राच्या पूर्ततेकडे पालिकेने गेली तीन र्वष दुर्लक्ष केले. आता केंद्र शासनाकडून पाणी वापराचे लेखापरीक्षण आणि जलमापकाप्रमाणे पाणी देयके पाठविता का म्हणून विचारणा झाल्याने साहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना गेल्या तीन वर्षांची जलमापकाप्रमाणे देयके पाठविण्याची संकल्पना सुचली आणि त्याची सर्वसाधारण सभेला कोणतीही माहिती न देताच अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.  
जलमापकाप्रमाणे पाणी देयके तयार करताना एका घरात सरासरी चार माणसे आहेत. ती माणसे दररोज १४० लिटर पाणी वापरतात. तीस दिवसांत ही माणसे ४२०० गॅलन पाणी वापरतात. वापरलेल्या पाण्याला पालिकेच्या पाणी दराच्या साडेसहा रुपये दराने गुणून आलेले देयक तयार करण्यात आले आहे. यावेळी गेल्या तीन वर्षांत रहिवाशांनी नव्वद रुपयांनी जो पाणी देयक भरणा केला आहे. तो मोठय़ा चलाखीने वजा करण्यात आला आहे. केवळ केंद्र शासनाला आम्ही जलमापकाप्रमाणे नागरिकांना पाणी देयक पाठवितो हे ‘नाटक’ दाखविण्यासाठी हा सरासरी देयकाचा ‘देखावा’ उभारण्यात करण्यात आला असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
वाढीव देयक का पाठविले म्हणून विचारणा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पाणी विभागातून पहिले आलेले देयक भरा. मग  तुमची वाढीव रक्कम आपण पुढील पाणी देयकात वळती करून घेऊ असे सांगण्यात येत आहे. वेळेत देयक भरणा न केल्यास सहा टक्के दराने दंड आकारणी करण्यात येईल असा इशाराही देयकात देण्यात आला आहे. अशा प्रकारची देयके तयार करण्याचे अधिकार अनिल लाड यांना कोणी दिले या प्रश्नावरून पालिकेत प्रचंड गदारोळ होणार आहे. अधिक माहितीसाठी संगणक विभागाचे प्रमुख साहाय्यक आयुक्त, कायदेतज्ज्ञ अनिल लाड यांच्याशी सतत संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्या भ्रमणध्वनीचा गजर होत होता पण ते त्यास प्रतिसाद देत नव्हते.
कसे पाठविले पाणी देयक!
डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमधील शांताराम पाटील चाळीत २५ रहिवासी राहतात. त्यांना पाणी देयकाचा ९० रुपये दर आहे. १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ या काळात चाळीतील रहिवाशांनी २८ हजार रुपये देयक भरणा केला. १ एप्रिल २०१२ ते ३० सप्टेंबर २०१२ कालावधीत १३ हजार ५०० देयक भरणा केला. आता या चाळीला १४ जून २०१० ते १९ फेब्रुवारी २०१३ या कालावधीचे जलमापकाप्रमाणे पाणी वापराचे ६४ हजार ६८० रुपये देयक पाठविण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांत ९० रुपयाने पाणी देयक भरणा केलेली रक्कम या रकमेतून वजा करून ४७ हजार ०७३ रुपये भरणा करण्याचे चाळीला सूचित करण्यात आले आहे. आता चाळीचा जलमापक रीिडग ४२५५ आहे. त्याप्रमाणे १७ हजार १६८ एवढी पाणी वापर देयक रक्कम आहे.
पाणी विभाग अंधारात
नागरिकांना पाठविलेल्या या सरासरी पाणी देयकाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असलेले पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले, अशा प्रकारे मागील तीन वर्षांची सरासरी पाणी देयके पाठविण्यात आली आहेत असे करणे गरजेचे नव्हते. संगणक विभागातूनच हा गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे. नागरिकांचे याबाबत खूप दूरध्वनी येत आहेत, अशी कबुली कुलकर्णी यांनी दिली.

Story img Loader