गणेशोत्सवात भारनियमन करण्यात येणार नसल्याचे शासनाने आणि महावितरणने जाहीर केले असतानाही दुसऱ्याच दिवशी सायंकाळी दीड तास अचानक वीज गायब झाल्याने संतप्त राजकीय पक्ष व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. अधिकाऱ्यांविरुद्ध निदर्शने व घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथे महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद सोनकुसळे व मनमाडचा अतिरिक्त कार्यभार असलेले कनिष्ठ अभियंता व्ही. बी. भोये हे उपस्थित झाले.
पोलीस निरीक्षकांच्या कक्षातच संतप्त कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने वातावरण तणावग्रस्त बनले. पुन्हा भारनियमन झाल्यास शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन न करण्याचा लेखी इशारा कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात दिला.मंगळवारी सायंकाळी सव्वासात ते नऊ या दरम्यान शहरातील भाग एक व दोनमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर अंधारात बुडाले. अचानक वीज गेल्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात चौकशीसाठी दूरध्वनी केले असता त्यांना उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढत महावितरण कार्यालय गाठले.
परंतु अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले. पोलीस निरीक्षक सी. डी. बनगर यांनी हस्तक्षेप करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलविले. कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची फिर्याद दिली. शहरात पुन्हा भारनियमन केल्यास गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला.या वेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद, रिपाइंचे गंगाभाऊ त्रिभुवन आदींनी फिर्याद दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा