खासगी कंपन्यांकडून घेण्यात येणारा वीजपुरवठा तांत्रिक कारणास्तव बंद झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक शहरांना अघोषित भारनियमनास सामोरे जावे लागत असून त्यामध्ये ठाणे शहराचाही समावेश आहे. ठाणे शहर, वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा-मुंब्रा आदी भागांत सोमवारपासून अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले असून पुढील तीन दिवस अशाप्रकारे भारनियमन सुरूच राहील, असा अंदाज महावितरणने वर्तविला आहे. वीज पुरवठय़ाच्या श्रेणीनुसार महावितरणने अघोषित भारनियमनाचे नियोजन केले असून सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत सुमारे तीन ते पाच तास शहरातील बत्ती गुल होणार आहे.

राज्यातील विजेची गरज भागविणाऱ्या अदानी, इंडिया बुल्स आणि जेएसडब्ल्यू तसेच केंद्रीय प्रकल्पातील संच अचानकपणे बंद पडले. त्यामुळे विजेची तूट निर्माण झाल्यामुळे महावितरणने राज्यात सुमारे तीन ते सहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. दरम्यान, राज्यातील विजेचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महावितरणने केंद्रीय एक्स्चेंजमधून वीज घेतली आहे. तसेच इंडिया बुल्स आणि परळीचा संच सुरू केला आहे. तरीही यंत्रणेत सुमारे दोन हजार मेगाव्ॉटची तूट असल्याने भारनियमन करावे लागत आहे, अशी माहिती महावितरणने दिली आहे. विजेचा पुरवठा तांत्रिक कारणास्तव बंद पडल्यामुळे राज्यासह ठाणे शहरात सोमवारपासून तीन ते साडेपाच तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्यामुळे उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असतानाच भारनियमन सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  
ठाणे शहर, वागळे इस्टेट, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आदी भागांत महावितरण श्रेणीनुसार वीजपुरवठा करते. ठाणे, वागळे, घोडबंदर आदी परिसर ‘अ’ क्षेत्रात येतो. त्यामुळे या भागात गेल्या दीड वर्षांपासून भारनियमन बंद करण्यात आले आहे. मात्र, या भागांना अघोषित भारनियमनाचा फटका बसला असून या भागात सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रांत तीन ते चार तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. तर कळवा, खारेगाव आणि मुंब्रा भागात मात्र भारनियमन सुरूच असून अघोषित भारनियमनामुळे या भागात सुमारे चार ते साडेपाच तास बत्ती गुल राहणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली. अघोषित भारनियमामुळे दररोज होणाऱ्या भारनियमनामध्ये काहीशी वाढ झाली आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येत्या बुधवापर्यंत संचाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. मात्र, तोपर्यंत शहरात अघोषित भारनियमन सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader