ऐन उन्हाळ्यात उरण शहरातील वीज सातत्याने गायब होत असून शहरातील विजेच्या लपंडावामुळे व्यावसायिक तसेच नागरिकही त्रस्त झालेले असताना दुरुस्तीच्या कामासाठी वीज जात असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे.
शहरात भारनियमन नसल्याचे महावितरणचे अधिकारी वारंवार सांगत असले तरी उरण शहरातील अनेक भागांतून दर दोन तासांनी वीज गायब होत आहे. सकाळी तसेच सायंकाळी ही वीज गायब होत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सध्या लग्नांचा हंगाम सुरू असल्याने खरेदीदारांची प्रचंड गर्दी दुकानात असताना अचानकपणे वीज गायब होत असल्याने याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याचे उरणमधील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील वीज नियमित ठेवून महावितरणला एखाद्या विभागात काम करण्यासाठी वीज बंद करावयाची असल्यास त्याची कल्पना देणे आवश्यक असल्याचे मत मनोज ठाकूर या दुकानदाराने व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे शहरातील विजेच्या लपंडावाचा सर्वाधिक त्रास येथील रुग्णांनाही होत आहे.

चाळीस वर्षांपूर्वीच्या विजेच्या तारा
उरणमधील महावितरणचे उपभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता शहर व परिसरातील विजेच्या तारा चाळीस वर्षांपूर्वीच्या असल्याने त्या तुटण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी वाहनांमुळे तारा तुटत असल्याने तारांच्या दुरुस्तीसाठी वीजप्रवाह बंद करावा लागत असल्याचे मत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader