महिन्याच्या प्रत्येक आठवडय़ाला विजेच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेऊनही पनवेलमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही बुधवारी याची प्रचीती पनवेलकरांना आली. रात्री नऊ वाजता विजेच्या गायब होण्याने पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या गरबा रासलीलेवर पाणी फिरले. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी जनरेटरची सोय केल्याने काही ठिकाणी दांडीया खेळण्याची सोय झाली. मात्र घरातून निघतानाच वीज जाण्याने अनेकांनी दुर्गादेवींच्या दर्शनासाठी घराबाहेर पडणे टाळले. अखेर रात्री साडेदहा वाजता वीज प्रकट झाली. बुधवारी सायंकाळी प्रचंड वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे काळुंद्रे गावाजवळ एक झाड वीज डीपीवर पडल्याने वीजप्रवाह खंडित झाल्याची माहिती वीज महावितरण कंपनीने दिली. पनवेलकरांना रोजप्रमाणे सणासुदीच्या काळात विजेचे चटके भोगावे लागतात. पनवेलमध्ये नव्याने होणाऱ्या टोलवरून राजकारण तापलेले पाहायला मिळते मात्र वेळीच वीजबिले भरूनही ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी थंड बसल्याचे पाहायला मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा