राज्यातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला कंटाळली असून राज्यात अद्यापही भारनियमन रद्द झालेले नाही. शेतकरीहिताचे कोणतेही निर्णय नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे आपापसात भांडण सुरू आहे. त्यामुळे पुढील सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव होईल, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर धुळे ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आ. दादा भुसे, आ. प्रा. शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, डॉ. सुभाष भामरे यांसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळी पाटील यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघात आमदारांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कामाची स्तुती केली. सामान्य माणसांशी बांधीलकी ठेवून तालुक्यातील शिवसेना सत्तेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवीत आहे.
 जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. त्याबरोबरच पंचायत समितीत ३४ पैकी एकतृतीयांश बहुमत सेना-भाजपला मिळेल असे चित्र दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला. आ. दादा भुसे यांनी शरद पाटील यांच्यामुळेच अक्कलपाडा धरण त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे पूर्ण होऊ शकले, असे नमूद केले. तालुक्यातील जनतेला पाच हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वच निवडणुकांमध्ये युतीचा विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले. या प्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. सुभाष भामरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्तावनेत उपजिल्हाप्रमुख प्रा. अरविंद जाधव यांनी पराभूत मनोवृत्तीच्या नेत्यांच्या आमिषाला बळी पडून पक्षद्रोह करणाऱ्या फुटीरवादी प्रवृत्तींचा समाचार घेत त्यांना धडा शिकविण्याचा निर्धार केला.
आ. शरद पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडत जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता प्रस्थापित करण्याचा विश्वास व्यक्त केला. आपल्या चार वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळाचा आढावाही त्यांनी मांडला. तालुक्यातील आपल्या विरोधकांवर आपण मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे उद्घाटन करण्याची नामुष्की ओढवली असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद निवडणुकीतील ‘निमडाळे पद्धत’ची उल्लेख करीत ही पद्धत मदत करणारी व मदत घेण्याचीही असू शकते, असे ते म्हणाले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती कैलास पाटील, नितीन पाटील, देवीदास माळी, शंकर खलाणे यांसह अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मनीष जोशी यांनी केले. आभार विश्वास पाटील यांनी मानले.

Story img Loader