नियमित देयके भरली जात नसल्याने मनमाडकरांच्या भारनियमनात सध्या वाहिनीनिहाय वाढ होऊन ते जवळपास आठ तासांवर गेले आहे. ग्राहकांनी थकीत वीज देयके भरल्यास भारनियमनातून मुक्ती मिळू शकते, असे महावितरणने म्हटले आहे.
मनमाड शहरात भारनियमनाचा मुद्दा वारंवार गाजत असतो. काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेच्या थकबाकीवरून महावितरणने शहरातील पथदीपांचा वीज पुरवठा खंडित केला होता. दिवसा व रात्री होणाऱ्या भारनियमनाच्या मुद्यावरून स्थानिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. दुसरीकडे नियमित देयके भरली जात नसल्याने भारनियमनाचे चटके मनमाडला सहन करावे लागत आहे. मनमाड शहर एक वाहिनीवरील ग्राहकांची जवळपास ७२.२० लाख तर मनमाड शहर दोन वाहिनीवरील ग्राहकांची १६६ लाख रुपयांची वीज देयके थकीत आहेत. महावितरण ज्या वाहिनीवर वसुली प्रमाणापेक्षा कमी व गळती जास्त आहे, अशा इ, फ, ग वाहिन्यांवर भारनियमन करत असते. मनमाड शहर एक वाहिनीवरील गळतीचे प्रमाण ५४.६९ टक्के असून ते शहर दोन वाहिनीवर ५२.६६ टक्के इतके आहे. काही ग्राहकांनी नियमित वीज देयके न भरल्याने तसेच अनधिकृतरित्या विजेचा वापर केल्यामुळे गळती वाढली. परिणामी, ग्राहकांना अधिक भारनियमन सहन करावे लागत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. सध्या मनमाड शहर एक व शहर या दोन्ही वाहिन्या थकबाकी व गळती यामुळे ‘फ’ गटातून ‘ग’ गटात गेल्या आहेत. त्यामुळे भारनियमनात वाढ झाली.
महावितरण अ, ब, क, ड गटातील वाहिन्यांवर भारनियमन करत नाही. ग्राहकांनी नियमित देयके भरल्यास व अनधिकृत विजेच्या वापरास प्रतिबंध घातल्यास मनमाडच्या वाहिन्या देखील उपरोक्त गटात येऊ शकतात. यामुळे ग्राहकांनी थकीत व चालू देयके भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Story img Loader