* शहरातील बहुतेक रस्त्त्यांची चाळण
* विकासकामांमध्ये दिरंगाई
* कृत्रिम तलावातही भ्रष्टाचाराचा भराव
* बेमुदत उपोषणाचा इशारा
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या बदलापूर शहराच्या विकासाचे बिंग फुटले असून नागरी सुविधांचा प्रचंड बोजवारा उडाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषत: शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून त्यातून ये-जा करताना नागरिकांचा जीव मेटामुटीस येऊ लागला आहे. खड्डय़ांमध्ये रिक्षा तसेच वाहने आदळून कंबरदुखी तसेच धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले आहेत. रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने ४० लाख रुपये खर्च केले. त्यासाठी प्राकलनात ३८४ ट्रक खडी आणि १३८ ट्रक ग्रीट वापरल्याचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात इतका माल वापरण्यातच आलेला नाही, असा दावा कुळगांव-बदलापूर इंजिनीअर्स असोसिएशनने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. गणेशोत्सव काळात पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावाच्या तसेच वृक्षारोपणासाठी खरेदी करण्यात आलेल्या रोपांमध्येही गैरव्यवहार झाल्याचा आरोप संघटनेने केला असून यासंदर्भात ३१ ऑक्टोबपर्यंत चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई न झाल्यास ऐन दिवाळीत १ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बदलापूरकर हैराण आहेत. पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे ठराव केले असले तरी तिजोरीत मात्र निधीचा खडखडाट आहे. पालिकेने त्यासाठी शासनाकडे ३० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ते पैसे मिळून प्रत्यक्ष काम व्हायला आणखी सहा महिने लागू शकतील. तूर्त पालिकेने रस्त्यांची ३० ऑक्टोबपर्यंत डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
चौकशी आणि कारवाईची अपेक्षा   
एकीकडे रस्त्याच्या कामांना पैसे नसल्याचे कारण सांगणाऱ्या पालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी तब्बल आठ लाख रुपये खर्च केले आहेत. प्राकलनात तलाव निर्मितीसाठी ११ हजार ५०० गोणी रेती तसेच पॉलिथिन वापरल्याचे दर्शविण्यात आले आहे. एवढय़ा गोणी एकावर एक रचल्या तर तीन मजली इमारतीएवढा ढीग जमा होईल, असे अभियंता संघटनेचे संभाजी शिंदे यांनी सांगितले. प्रत्यक्षात दहा टक्केही माल वापरण्यात आलेला नाही, असा आरोपही संघटनेने केला आहे. शहरात वृक्ष लागवड करण्यासाठी दहा लाख रुपयांची रोपे मागविण्यात आली, ती कुणाला दिली, त्या रोपांची कुठे लागवड करण्यात आली, असे प्रश्नही संघटनेने उपस्थित केले आहेत. या कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अभियंता संघटनेने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. 

Story img Loader