घनकचरा खासगीकरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी फेटाळून लावण्यात आला. आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल व किशनचंद तनवाणी, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. सेनेच्या नेत्यांनीच विरोध केल्याने पदाधिकाऱ्यांना प्रस्ताव मंजूर करून घेणे अवघड झाले असते. अपेक्षेप्रमाणे सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
शहरातील कचरा गोळा करण्यासाठी खासगी ठेकेदारांनी प्रत्येक घरातून रक्कम घ्यावी, असे प्रस्तावाचे स्वरूप होते. बंगल्यातील कचरा उचलण्यासाठी प्रत्येकी पाच रुपये, सदनिकांमधून दोन रुपये, व्यावसायिक मालमत्ता व मोठे हॉटेल्ससाठी २०० रुपये, मध्यम व्यावसायिक व हॉटेलसाठी १०० रुपये, तर मॉलसाठी ५०० रुपये दर आकारण्याचे ठरविण्यात आले होते. खासगी कंत्राटदाराने कचरा उचलावा आणि पैसे घ्यावेत, असे या प्रस्तावाचे स्वरूप होते. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनीच पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिल्याने सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
नगरसेविकेस डेंग्यू व महापालिका प्रशासन
नगरसेविका प्रीती तोतला यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त होते. त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. तेथेच केलेल्या रक्ताच्या चाचण्यांमध्ये डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले. तो अहवाल नंतर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी जयश्री कुलकर्णी यांनी घाटी रुग्णालयात त्याची फेरतपासणी केली. त्यासाठी रक्ताचे नमुनेही पाठविले. मात्र, घाटी रुग्णालयाच्या अहवालात नगरसेविकेला डेंग्यू नसल्याचे स्पष्ट झाले. डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त समजताच आरोग्य अधिकाऱ्यासह स्वच्छता विभागाने वॉर्डात लगेच धूरफवारणी केली. कचराही उचलला. आज सर्वसाधारण सभेत नगरसेविकेला झालेल्या डेंग्यूवर चर्चा झाली. आरोग्य अधिकारी जयश्री कुलकर्णी आपल्यावर काही ठपका येऊ नये म्हणून अहवाल बदलत असल्याचा आरोप तोतला यांनी केला. प्रभागातील स्वच्छता होण्यासाठी नगरसेवकांना आजारी पडावे लागेल काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

Story img Loader