डोंबिवली पूर्व भागातील दत्तनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम काही झोपडपट्टीदादांनी रोखून धरल्याने हे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या योजनेसाठी रहिवाशांनी आपली राहती घरे महापालिकेच्या स्वाधीन केली आहेत. जुन्या घरांमध्ये झोपडीदादांनी घुसखोरी केल्याने खळबळ उडाली आहे.
कोणत्याही परिस्थितीत ‘झोपु’ योजना या जागेत होऊ द्यायची नाही, असा चंग झोपडीदादा, काही बंगलेमालक तसेच ठराविक हॉटेलमालकांनी बांधल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात उतरत नसल्याची टीका स्थानिक नगरसेविका भारती मोरे यांनी केली आहे. झोपडीदादांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी दत्तनगर झोपु योजनेतील ४३९ लाभार्थी गेल्या दोन दिवसापासून दत्तनगर ‘झोपु’ योजनेच्या जागेत लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहेत.
दत्तनगर ‘झोपु’ योजनेचे काम १८ महिन्यांत पूर्ण करून तेथील घरांचा ताबा देण्याचा प्रकल्प आखण्यात आला होता. चार वर्षे उलटली तरी या योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. रहिवाशांच्या जुन्या घरांमध्ये काही झोपडीदादांनी घुसखोरी केल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यानुसार महापालिका अधिकारी रवींद्र पुराणिक, चंदुलाल पारचे यांनी संबंधित घरांची पाहणी केली, अशी माहिती नगरसेविका भारती मोरे यांनी दिली.
सीबीआय तपास विचाराधीन
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत गंभीर गैरप्रकार झाल्याने याप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे चौकशी करण्याची सूचना राज्याच्या पोलिस महासंचालकांनी शासनाकडे केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात झोपु योजनेतील घोटाळाप्रकरणी एका जनहित याचिका दाखल आहे. न्यायालयाने महाराष्ट्र शासनाकडे पोलिसांच्या मताविषयी अभिप्राय मागविला आहे. पोलिसांच्या अहवाल शासनाच्या विचाराधिन असल्याचे उत्तर गृह विभागाने माहिती अधिकारात दिले आहे.

Story img Loader