डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर टपाल कार्यालयाची दोन माळ्यांची इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना सेवा देणारे पश्चिमेतील एकमेव विष्णुनगर टपाल कार्यालय डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयात तीन दिवसांपूर्वी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पश्चिमेतील ग्राहकांना टपाल सेवेसाठी यापुढे डोंबिवली पूर्व भागात धाव घ्यावी लागणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, वृद्धांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुमारे सात ते आठ वर्षांपासून विष्णुनगर टपाल कार्यालयाची इमारत धोकादायक बनली आहे. यासंबंधीच्या तक्रारी तेथील कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी करण्यात आल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरच निधी येणार आहे, डागडुजी सुरू आहे, रंगरंगोटी करण्यात येणार अशी ठोकळेबाज उत्तरे देण्यात येत होती. विष्णुनगर टपाल कार्यालय ही टपाल विभागाची मालकीची वास्तू आहे. तरीही टपाल विभागाने या वास्तूच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या इमारतीला चारही बाजूने गळती लागली आहे. झडपा तुटल्या आहेत. छताला तडे गेल्याने कार्यालयात मोठी गळती लागली आहे. लाखो ग्राहक दररोज या टपाल कार्यालयातून ग्राहक सेवा घेतात. पोस्टमनना बसण्यास टपाल कार्यालयात जागा नसल्याने गेल्या वर्षी विष्णुनगर टपाल कार्यालयातील सुमारे ३० ते ३५ पोस्टमनना फडके रस्ता टपाल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. आता टपाल कार्यालयातील ग्राहक सेवा देणारा ३० ते ४० कर्मचारी वर्ग फडके रस्ता कार्यालयात साहित्यासह हलविण्यात आला आहे.
फडके टपाल कार्यालय तुटपुंज्या जागेत आहे. या जागेत अगोदरच २० ते २५ कर्मचारी काम करतात. तेथे आता नव्याने ३० कर्मचाऱ्यांची भर पडल्याने ग्राहक आणि कर्मचारी असा सगळ्यांचाच जीव गुदमरू लागला आहे. कार्यालयात स्वतंत्र प्रसाधनगृह नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. कुजट, कुबट वातावरणामुळे येथील कर्मचारी हैराण झाले आहेत. फडके टपाल कार्यालयाची अवस्था अतिशय दयनीय आहे. खिडक्यांची तावदाने खराब झालीत आणि तर इमारतीचे प्लॅस्टर गळून पडले आहे. विष्णुनगर टपाल कार्यालयातील कागदपत्र नेऊन टाकण्यात आली आहेत. ती शोधायची आणि ग्राहकांना सेवा द्यायचे दिव्यकर्म कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. तत्पर सेवा मिळत नसल्याने ग्राहक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली आहे.
पश्चिमेतील अनेक नागरिकांची एमआयएस, बचत तसेच इतर गुंतवणूक खाती विष्णुनगर टपाल कार्यालयात आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृद्धांचा सर्वाधिक भरणा आहे. त्यांना ४० ते ५० रुपयांचा भरुदड भरून रिक्षाने या कार्यालयात जावे लागणार आहे. एजंटांना या कार्यालयात उभे राहण्यास जागा नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. दोन स्वतंत्र टपाल कार्यालयांचा भार फडके टपाल कार्यालयावर आल्याने येथील कामकाज मंदावले आहे.  
याबाबत ठाण्याचे वरिष्ठ अधीक्षक प्रकाश शेळके यांच्या भ्रमणध्वनीवर सतत संपर्क केला तो होऊ शकला नाही. त्यांच्या कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने विष्णुनगर टपाल इमारत धोकादायक झाल्याने ती इमारत रिकामी करण्यात आली आहे. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी ईमेलद्वारे संपर्क करावा, असे सांगितले. टपाल विभागाच्या इमारत विभागाशी संपर्क साधला तेथे कोणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा