प्राध्यापकांच्या संपामध्ये तडजोड होत नसल्याने विद्यार्थ्यांवर ताण येऊ लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी संघटनांनी बुधवारी शिवाजी विद्यापीठात कुलगुरू, सुटाचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी यांना कोंडून घातले. सुमारे दोन तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू राहिले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तथापि, उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.    
विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी गेल्या दोन महिन्यांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. परीक्षा पुढे जाण्याबरोबरच नवीन शैक्षणिक वर्षांतही अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. तर दुसरीकडे शासन व प्राध्यापकांच्या संघटना यांच्यामध्ये तडजोड होण्याची चिन्हे दिसत नाही. या सर्व प्रकारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी प्रचंड तणावातून वावरत आहेत. याला वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी बुधवारी शिवाजी विद्यापीठात अचानक आंदोलनाला हात घातला.     विद्यापीठाच्या एम. सी. हॉलमध्ये कुलगुरू डॉ. पवार, सुटाचे पदाधिकारी, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी संघटना यांच्यामध्ये प्राध्यापकांच्या संपाच्या विषयावरून चर्चा सुरू होती. दुपारी साडेचार वाजता सुरू झालेली ही चर्चा दोन तास झाले तरी कोणत्याही निर्णयाप्रत येत नव्हती. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी अचानक आक्रमक पवित्रा घेत चर्चा सुरू असलेल्या सभागृहालाच टाळे ठोकले. यामुळे कुलगुरूंसह सुटाचे सदस्य, अधिकारी कोंडले गेले.    
काही काळानंतर विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करण्याची आर्जव करण्यात आली. सुटाचे नेते प्रा. ढमकले यांनी एम.फुक्टो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कुलगुरू डॉ.पवार हे चर्चेवेळी सकारात्मक असल्याचे दिसले. उद्यापर्यंत चांगला निर्णय होईल, असे मत प्राध्यापक ढमकले यांनी व्यक्त केले. मात्र उद्या सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व शिवाजी विद्यापीठ महासंघाचे अध्यक्ष श्रीधर पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे रोहित पाटील, अवधूत अपराध, अभाविपचे अमित वैद्य, मनसेचे झुंजार पाटील, अभिजित राऊत आदींनी केले.