नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील चार हजारावर मतदान केंद्रांवर उद्या गुरुवारी मतदान होणार असून त्यासाठी सुरक्षा जवानांसह मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान करता येणार आहे.
नागपूर मतदारसंघात ६१ व रामटेक मतदारसंघात ४७, असे एकूण १०८ क्रिटीकल मतदान केंद्र आहेत. ज्यांच्या कुटुंबाच्या नावांचा शोध लागलेला नाही, ओळखपत्रे नाहीत अशा मतदारांचा यात समावेश आहे. या प्रत्येक १०८ केंद्रांवर प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. नागपूरमध्ये एकूण १ हजार ८२८ तर रामटेक मतदारसंघात एकूण २ हजार २३१, असे नागपूर जिल्ह्य़ात एकूण ४ हजार ५९ मतदान केंद्र आहेत. नागपूरमध्ये नऊ व रामटेकमध्ये दहा संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रात एक शिपाई व एक गृहरक्षक तैनात राहणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रात एक शिपाई व चार सशस्त्र जवान तैनात राहतील. रामटेक मतदारसंघात १ हजार ३३५ पोलीस, ३२१ गृहरक्षक, २९२ प्रशिक्षणार्थी पोलीस व राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय निमलष्करी दल मिळून दोन कंपन्या तैनात आहेत. नागपूरमध्ये २ हजार ५५८ पोलीस, १ हजार ६१ गृहरक्षक, राज्य राखीव पोलीस दलाच्या १८ तर केंद्रीय निमलष्करी दलाच्या ३६ तुकडय़ा तैनात आहेत.
नागपूरमध्ये ७ हजार ३१२ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात १ हजार १०० महिला आहेत. या व्यतिरिक्त १ हजार ७८ अधिकाऱ्यांना राखीव ठेवण्यात आले आहे. रामटेक मतदारसंघात ८ हजार ९२४ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात २ हजार २३१ महिला आहेत. या व्यतिरिक्त १ हजार ३४४ अधिकाऱ्यांना राखीव ठेवण्यात आले आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात एकूण १ हजार १५ वाहने वापरली जात असून त्यात ३८६ बस, ३१ ट्रक, ५३४ जिप, ४० कार, १२ अग्मिशमन तर बारा रुग्णवाहिकांचा समावेश आहे.  ज्यांचे नाव मतदार यादीत आहे पण निवडणूक आयोगाची ओळखपत्र नाही, अशा मतदारांना ओळखीचा पुरावा दाखवून मतदान करता येईल. मात्र, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे पण मतदार यादीत नाव नाही, अशांना मतदान करता येणार नाही. संपत्तीच्या प्रतिज्ञापत्राबाबत आक्षेप असल्यास त्यासाठी प्रतिप्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. मुत्तेमवार यांच्या प्रतिज्ञापत्रास आक्षेप घेणाऱ्यांनी प्रतिप्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अंजली दमानिया यांच्या प्रतिज्ञापत्रास आक्षेप घेणाऱ्यांनी प्रतिप्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. ही दोन्ही प्रतिज्ञापत्रे जाहीर करणे, एवढीच निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी पंजाबराव वानखडे, जिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे व जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

मतदारांनो, मतदान करा
*  मतदार यादीत नाव आहे, पण निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसले तरी मतदान करता येईल.
*  निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे, पण मतदार यादीत नाव नाही, अशांना मतदान करता येणार नाही.
*  निवडणूक ओळखपत्र नसेल पारपत्र (पासपोर्ट), वाहन परवाना, राज्य, केंद्र, सार्वजनिक उपक्रमाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले सचित्र ओळखपत्र, बँका व टपाल कार्यालयाद्वारे देण्यात आलेले सचित्र ओळखपत्र, सचित्र पासबुक, आयकर ओळखपत्र (पॅन कार्ड), आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, निवृत्ती ओळखपत्र, निवडणूक विभागातर्फे देण्यात आलेली सचित्र मतदार पावती यापैकी कुठलाही एक पुरावा सोबत न्या.
*  मदतीसाठी १८००२३३९००० या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधता येईल.
*  मतदान केंद्रावर वाहनांची गर्दी करू नका.
*  मतदानासाठी जाताना आवश्यक असल्यासच स्वत:चे वाहन वापरा.
* मतदान केंद्रात मोबाईल, शस्त्र वा कॅमेरा नेण्यास मनाई आहे.
* ‘निर्भयतेने मतदान करा’, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षिका डॉ. आरती सिंह आदींनी केले आहे.