सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते, असा सिद्धान्त मांडला जातो. सत्तेने केवळ सत्तेचीच चटक लागते असे नाही, तर त्याबरोबरच सगळ्या विषयात आपण एकटेच तज्ज्ञ आहोत, असेही भास व्हायला लागतात. सत्ता ही एक अशी जादुई गोष्ट असते, की ती चोरपावलांनी येते आणि महामार्गाने निघून जाते. राष्ट्रवादीचे नगरसेवक बापू पठारे यांनी पुण्याच्या पाण्याबद्दल जे काही वक्तव्य केले आहे, ते वाचल्यानंतर कुणाही सामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढेल यात शंका नाही. त्यांचे तरी काय चूक? त्यांच्याच पक्षाचे राज्यातील सर्वेसर्वा अजित पवार यांनी याूर्वी असेच विधान केले होते. नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवणारेच राजकारणात पटपट वर जातात, हा तर आजवरचा अनुभवच आहे. आता याच दादांनी शहराला चोवीस तास पाणी पुरवण्याचे गाजर दाखवले. दादा जे सांगतात, ते करतात, अशी त्यांच्याबद्दल ख्याती असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. ते खरे मानले, तर दादा, पठारे यांच्याबाबत काय करणार, याबद्दल कमालीची उत्सुकता वाटणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. याच दादांनी काही वर्षांपूर्वी पुणेकरांच्या पाणीवापराबद्दल अगदी असेच उद्गार काढले होते. त्यांच्या मते पुणेकर नागरिक पाणी मोटारी धुण्यासाठी वाया घालवतात. आता तेच दादा पुण्याला जेव्हा चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखवतात, तेव्हा त्याचा अर्थ त्यांचे मत बदलले आहे, असाच घ्यायला हवा. दादांनी तो तसाच असल्याचे आता पुन्हा एकदा जाहीर मात्र करायला हवे. कारण त्यांचेच एक नगरसेवक त्यांच्या नव्या भूमिकेच्या नेमके त्यांच्याविरुद्ध बोलत आहेत. भारतात लोकशाही आहे, हे खरे आहे. परंतु राजकीय पक्षांमध्ये इतकी लोकशाही असेल, यावर कुणाही भारतीयाचा विश्वास बसणे शक्य नाही. राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेण्याचे इतके स्वातंत्र्य असते, हे पठारे यांच्या वक्तव्यामुळेच कळले. प्रश्न आहे तो पुण्याच्या पाणी पुरवठय़ाचा. पुण्याला नेमके किती पाणी आवश्यक आहे, पाटबंधारे खात्याकडून नेमके किती पाणी धरणातून सोडण्यात येते, त्यापैकी किती पाणी प्रत्यक्षात जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचते, तेथून ते साऱ्या शहराला सम प्रमाणात मिळते का, की काही भाग कोरडे ठणठणणीत आणि काही भागात पाण्याची रेलचेल असे चित्र आहे, यासारख्या अनेक प्रश्नांसाठी पालिकेकडे उत्तरे नाहीत. वाटेल तसे पाणी वापरण्याची सवय मागील निवडणुकीत लावण्यात आली. त्यामुळेच तर यंदा पावसाळ्यात पाणी कमी मिळणार असे लक्षात आल्यानंतर सगळ्यांचे धाबे दणाणले होते. शहरातील पाण्याचा वापर कोणत्या कारणांसाठी किती प्रमाणात होतो, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यानंतर बापू पठारे यांचे शहरात वॉशिंग सेंटर असल्याचे म्हणणे खरे आहे की खोटे, हे कळू शकेल. पठारे यांचे म्हणणे खरे मानले, तर त्याचा अर्थ असा होतो, की पुण्याला गरजेपेक्षा अधिक पाणी मिळते. तसे असेल, तर ज्या भागात पाणीच मिळत नाही, त्या भागातील नागरिकांना आपल्या आसवांवरच गुजराण करणे भाग आहे. जेथे भरपूर पाणी पुरवले जाते, असे भाग कोणत्या प्रभागात येतात, याचाही अभ्यास कधीतरी करणे शहरासाठी आवश्यक आहे. चोवीस तास पाणी पुरवल्याने त्याचा वापर कमी होतो, ते साठवण्याची प्रवृत्ती नष्ट होते आणि त्यामुळे पाणी वाटप यंत्रणेवरील ताणही कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. खरे खोटे फक्त बापू आणि दादाच जाणो!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा