इचलकरंजी येथील ब्राम्हण सभेच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना जाहीर झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती सभेचे अध्यक्ष सुरेश ऊर्फ बंडा जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.     
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासन, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी सभेच्या वतीने पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. सी. डी. काणे, डॉ. एम. एस. कुलकर्णी, वा. गो. गोगटे, डॉ. अर्जुन वाडकर, डॉ. नागवेकर, विनया गद्रे आदींना देण्यात आला आहे.     
चार्टर्ड अकौटंट मनोहर जोशी हे जवाहर साखर कारखान्याच्या उभारणीपासून आत्तापर्यंत कार्यकारी संचालक पदावर आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापनातून त्यांनी कारखान्याचे नाव लौकिक केले आहे. उत्कृष्ट तरुण कार्यकारी संचालक म्हणून त्यांचा देशपातळीवर गौरव झाला आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. अखिल भारतीय साखर महासंघाच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची निवड निश्चित झाली आहे. कर्तृत्वातून शहराचे नावलौकिक केलेले श्री. जोशी यांना या वर्षीचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय सभेने घेतला आहे.