मराठी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने शेअर बाजाराची कार्यपद्धती समजून घ्यावी व गुंतवणुकीचे हे विस्तीर्ण दालन त्यांच्यासाठी खुले करण्याच्या हेतूने लोकप्रभा आणि सेंट्रल डिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस (इंडिया) लि. तर्फे ‘श.. शेअर बाजाराचा’ या कार्यक्रमाची मालिका आयोजित केली आहे. शेअर बाजारविषयक प्राथमिक पण महत्त्वाची अशी माहिती स्लाइड शोद्वारे या कार्यक्रमातून देण्यात येईल.
तीन कार्यक्रमांच्या मालिकेतील पहिला कार्यक्रम शनिवार, २७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, चौथा मजला, बोरिवली, पश्चिम, येथे चंद्रशेखर ठाकूर सादर करतील. ठाकूर हे सीडीएसएलच्या गुंतवणूकदार शिक्षण विभागाचे प्रमुख असून हा त्यांचा ९०१वा कार्यक्रम आहे. शेअर बाजारातील आपल्या ४५ वर्षांच्या अनुभवावर आधारित या कार्यक्रमात ते आयपीओ, ऑनलाइन ट्रेडिंग, स्टॉल एक्स्चेंजची सेटलमेंट यंत्रणा, गुंतवणूकदारांना असलेले संरक्षण, डीमॅटविषयक इंटरनेट सुविधा, म्युच्युअल फंड संकल्पना, पे इन पे आउट, टी प्लस २ वगैरे अनेक बाबी सोप्या शब्दात समजावून देतील.
दुसरा आणि तिसरा कार्यक्रम रविवार, २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता, मुलुंड जिमखाना, शहानी कॉलनीसमोर, नवघर रोड, मुलुंड पूर्व तसेच सोमवार, २९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता, दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल, आयडियल बुक डेपोजवळ, दादर पश्चिम येथे सादर होईल. हे दोन्ही कार्यक्रम सीडीएसएलचे अजित मंजुरे संबोधित करतील. पूर्णपणे विनामूल्य असलेल्या या दोन तासांच्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. आजवर कार्यक्रमांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहाता श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, कारण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश राहील.

Story img Loader