येत्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी येथे आलेले निरीक्षक गिड्ड रुद्र राजू यांना कॉंग्रेस पक्षातील गटबाजीचा सामना करावा लागला. माजी खासदार नरेश पुगलिया व पालकमंत्री संजय देवतळे गटाच्या समर्थकांनी वेगवेगळय़ा ठिकाणी निरीक्षकांची भेट घेऊन लोकसभेसाठी दावेदारी सादर केली. दरम्यान, ही गटबाजी लक्षात घेऊन दिवाळीनंतर १८ नोव्हेंबरला पुन्हा दौरा करण्याचे आश्वासन देऊन राजू निघून गेले.
अखिल भारतीय कॉंग्रेस समिती व महाराष्ट्र प्रदेशच्या निर्देशानुसार २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी निरीक्षक गिड्ड रुद्र राजू येथे आले होते. या जिल्ह्य़ात कॉंग्रेसमध्ये माजी खासदार नरेश पुगलिया व पालकमंत्री संजय देवतळे असे दोन गट सक्रीय आहेत. त्यातील पालकमंत्र्यांच्या गटाने विश्राम भवनावर, तर पुगलिया गटाने राजीव गांधी कामगार भवनात मुलाखत व बैठकीचे आयोजन केले होते. निरीक्षक रुद्र राजू सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास येथे दाखल होताच पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी त्यांना हायजॅक करून विश्रामगृहावर नेले. तेथे राजुराचे आमदार सुभाष धोटे, आमदार वामनराव कासावार, जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विनायक बांगडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शेखर धोटे, मनपा स्थायी समितीचे सभापती नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष मनोहर पाऊणकर, तालुका कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोहोकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निरीक्षकांची भेट घेऊन जिल्ह्य़ात कॉंग्रेससाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती दिली. या गटबाजीमुळे या जिल्ह्य़ात पक्षाची वाताहत झाल्याचे यावेळी निरीक्षकांना सांगण्यात आले. यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांसमोर तक्रारी व गाऱ्हाणीही मांडल्या. त्या ऐकून घेतांनाच पक्ष वारंवार पराभवाचा सामना करत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
निरीक्षकांना येथेच ९.३० वाजल्याने पुगलिया समर्थक राजीव गांधी भवनात प्रतीक्षा करत होते. पालकमंत्री समर्थकाच्या तावडीतून सुटका होताच निरीक्षक रात्री ९.४५ वाजता बैठकीच्या स्थळी पोहोचले. तेथे प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, महापौर संगीता अमृतकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, जिल्हा निरीक्षक महादेवराव कुंभलकर, प्रेमिला कुंटे, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष मुलचंदानी, गटनेता संतोष लहामगे, नगरसेवक अशोक नागापुरे व शेकडो कार्यकर्ते हजर होते.
यावेळी पुगलिया समर्थकांनी पक्षातील गटबाजीमुळे कॉंग्रेसला वारंवार पराभवाचा सामना करावा लागत असल्याची माहिती निरीक्षकांना दिली. २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष जिंकण्याच्या उंबरठय़ावर असतांना पक्षातील अंतर्गत विद्रोहामुळे जिंकलेली जागा गमवावी लागली. ही गटबाजी कायम दूर सारण्यासाठी पक्षाने ठोस पावले उचलावी, अन्यथा येत्या निवडणुकीतही पराभवाची पुनरावृत्ती होईल, असे सांगितले. यासोबतच कॉंग्रेस पक्षात राहून पक्षाला बदनाम करण्याचा डाव काही पदाधिकाऱ्यांनी चालविला आहे. अशा बंडखोर पदाधिकाऱ्यांना वेळीच समज देण्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांकडून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करण्यात येत असल्याचेही यावेळी पुगलिया समर्थकांनी निरीक्षकांना सांगितले.
यावेळी पुगलिया गटाकडून माजी खासदार नरेश पुगलिया यांची दावेदारी समोर करण्यात आली. दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निरीक्षकांनी काही सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडूनही पक्षाच्या सध्यस्थितीची माहिती जाणून घेतली. गटबाजी लक्षात घेऊन दिवाळीनंतर १८ नोव्हेंबरला पुन्हा एकदा बैठक घेण्याचे आश्वासन देत निरीक्षक नागपूरला रवाना झाले. 

Story img Loader