केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी होण्याची मनीषा बाळगणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ मार्गदर्शक ठरू शकेल, असा विश्वास येथील जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केला.
जैन हिल्स परिसरातील हिरवळीवर ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ या पुरवणीविषयी आयोजित कार्यक्रमात जैन बोलत होते. दहावी, बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
‘लोकसत्ता’च्या माध्यमातून केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग परीक्षेची तत्त्वे विद्यार्थ्यांना समजणार आहेत. या उपक्रमात अनेक प्रज्ञावंत तज्ज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शकांचा सहभाग असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही जैन यांनी व्यक्त केला. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर यांनी या वेळी ‘लोकसत्ता दहावी, बारावी परीक्षा व त्यानंतर काय’ यासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात ‘यशस्वी भव’ उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ हा विद्यार्थ्यांचा नेहमीच डोळस साथीदार राहिला आहे. त्या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद व त्यानंतरच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची गरज लक्षात घेता हा उपक्रम अधिक व्यापक करण्याची सूचना अनेकांनी ‘लोकसत्ता’कडे केली होती. त्याला अनुसरून स्पर्धा परीक्षा गुरू हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे कानिटकर यांनी नमूद केले. पुण्याच्या युनिक अकॅडमीचे जिल्हा समन्वयक प्रा. मुकेश पवार, सुकदेव शिरसाळे, ‘लोकसत्ता’चे स्थानिक वितरण व्यवस्थापक अनिल सोनवणे हेही या वेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा