नवरात्रौत्सवाच्या पहिल्या रात्रीचा उल्हास, जल्लोष आणि पहिल्या दिवसाचा पहिला रंग याची उत्सुकताच न्यारी. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता ९९९-नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेच्या पहिल्या अध्यायाची उधळण वाशीतील सेक्टर दहाच्या नवरात्री उत्सव मंडळात होणार आहे.
दुर्गादेवीने महिषासुराबरोबर ९ रात्री १० दिवस केलेल्या युद्धाची ही प्रतिकात्मक नवरात्र. या नऊ दिवसांत देवीने नऊ वेगवेगळी रूपे घेतली. म्हणून हे नऊ दिवस म्हणजे भक्तीची नऊ रूपे. यात ‘श्रवण’, ‘कीर्तन’, ‘स्मरण’, ‘पादसेवन’, ‘वंदन’, ‘अर्चन’, ‘दास्य’, ‘सख्य’, ‘आत्मनिवेदन’ या नऊ भक्ती आहेत. तसेच या नऊ दिवसांच्या नऊ रंगांबरोबर आपल्या अंतर्मनातील रंगांचीही होते उधळण. म्हणूनच ‘लोकसत्ता’ने जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९- नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. नवरात्रीतील ही प्रत्येक रात्र  ‘लोकसत्ता’ची टीम मुंबई, नवी मुंबई आणि डोंबिवलीतील नवरात्रौत्सव मंडळांबरोबर जागवणार आहे. यात मंगळागौर आणि इतर पारंपरिक खेळांच्या स्पर्धा रंगतील. जे समूह अतिशय चांगल्या पद्धतीने मंगळागौरीचे व पारंपरिक खेळ सादर करतील त्या समुहाला स्पर्धेच्याच ठिकाणी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सतर्फे आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. यानिमित्ताने हेमंत राणे आणि त्यांच्या ग्रूपचा ‘जागरण’ आणि ‘जोगवा’ही अनुभवता येणार आहे.नवरात्रौत्सवात देवीची पूजा जशी महत्त्वाची तसाच दांडिया आणि रासगरबाच्या तालात रंगणारी रात्र,  भव्य सजावटही तितकीच महत्त्वाची. महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात मोठय़ा उत्साहाने पारंपरिक तसेच वैविध्यपूर्ण कपडे परिधान करून सहभागी होतात. परंतु, मध्यमवयीन महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठय़ा प्रमाणावर सामील होऊ शकत नाहीत. असा महिलावर्ग मंगळागौरीचे खेळ आणि पारंपरिक खेळ सादर करण्याच्या या स्पर्धेत मात्र सहज सहभाग घेऊ शकतात. तसेच ज्या मंडळांना ‘लोकसत्ता’ची टीम भेट देणार आहे तेथील स्पर्धकांचा खेळ पाहण्याचा आनंद लुटण्याची संधी महिलांना यानिमित्ताने मिळणार आहे. ‘लोकसत्ता ९९९ – नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेमुळे नवरात्रौत्सवाला आगळी रंगत चढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा