अनिरुद्ध भातखंडे, – aniruddha.bhatkhande@expressindia.com
मराठी वाहिन्यांवर सध्या दैनंदिन मालिकांचा सुळसुळाट आहे. एक मालिका संपली (म्हणजे संपवली) की लगेचच दुसरी दाखल होते. यातील एखाद-दुसऱ्या मालिकेचा अपवाद वगळता त्यांच्यात दर्जेदार, सकस, अविस्मरणीय असं काहीच नसतं. सर्वात वाईट म्हणजे एखाद्या मालिकेतील एखादं कथासूत्र लोकप्रिय ठरलं अथवा ते वेगळं वाटलं तर अन्य मालिकांत लगेचच त्याचं प्रतिबिंब उमटतं. सध्या सुरू असलेल्या मालिकांतील जाणवलेले हे समान धागे..
दैनंदिन मालिका चालवायची म्हणजे काय खायचं काम आहे महाराजा? (किमान) वर्ष-दोन र्वष चालणाऱ्या मालिकेसाठी किती मोठी (रटाळ) पटकथा, (निर्थक आणि व्याकरणाचा गळा घोटणारे) संवाद लिहावे लागतात! सध्या कलाकारांची मांदियाळी आहे, लेखकांच्या आघाडीवर मात्र आनंदीआनंद. अशा परिस्थितीत थोडीशी उचलेगिरी केली तर बिघडलं कुठे? ती कोणाच्याही लक्षात येणार नाही याची काळजी घेतली की झालं. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’सारखी सोज्वळ मालिका कमालीची लोकप्रिय ठरल्याने त्यातील मध्यवर्ती कल्पना इकडेतिकडे फिरवून नव्या मालिकेत वापरली तर कोणाचं काय जाणार आहे? मुळात ते कोणाच्या लक्षात येणार आहे? अजून ओळखलं नाहीत, आता सांगूनच टाकतो. ‘एका लग्नाची..’च्या जागी दाखल झालेल्या ‘मला सासू हवी’ या मालिकेत ही फिरवाफिरवी करण्यात आली आहे.
वरकरणी तुम्हाला हे पटणार नाही. ही मालिका वेगळी वाटेल, मात्र मेंदूला थोडा ताण द्या. साम्यस्थळे लगेच आढळतील. दोन्ही मालिकांत एकत्र कुटुंब आहे, मुलंही तेवढीच म्हणजे तीन. तिकडे घना आणि राधा खोटंखोटं लग्न करतात. इकडेही काहीसा हाच प्रकार होऊ घातलाय. सासऱ्याच्या भूमिकेतील आनंद अभ्यंकर आणि सासूच्या भूमिकेतील आसावरी जोशी यांच्या नाटय़पूर्ण भेटी आता घडू लागल्येत. कालांतराने बिच्चाऱ्या मीराला सासू मिळेल, त्यानंतर घना आणि राधाप्रमाणे हो-ना करता करता हे आजी-आजोबा सुखाने (व नव्याने) संसार करू लागतील.. काय म्हणता, आम्ही कशाच्या जोरावर एवढं ठाम ‘आगाऊ’पणे सांगतोय, अहो सोपं आहे. एकतर ही मालिका ‘एका लग्नाची..’ संपल्यानंतर लगेचच सुरू झाल्ये. त्यात तिचाही जॉनर विनोदी आहे, त्यामुळे हलकेफुलके विनोदी प्रसंग, घोळ, समज-गैरसमज अशा वळणावळणांच्या मार्गाने जाऊन या मालिकेचा शेवट गोडच होणार, जरा बदल म्हणून तरुण नायक-नायिकांऐवजी मध्यवर्ती भूमिकेत आजी-आजोबा आहेत, एवढाच काय तो फरक. वेगळं काय आणि किती दाखवणार? टिंब टिंब टिंब मालिकेतून प्रेरणा घेऊन आम्ही ही मालिका केल्ये, असं तर कोणी सांगणार नाही ना? (मुळात ‘एका लग्नाची..’ हे ‘मुंबई-पुणे-मुंबई’तील जर्मवरच बेतलं होतं आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई’वर त्यापूर्वी आलेल्या ‘बिफोर सनराईज बिफोर सनसेट’चा खूप प्रभाव होता!)
मित्र हो, विनोदी मालिकांची नक्कल एकवेळ सुसह्य़ असते, मात्र तद्दन कौटुंबिक मालिकांच्या बाबतीत असं घडू लागलं तर ती डोकेदुखी ठरते. आपल्या मंजिरीचंच उदाहरण घ्या ना, तीच ती, ‘तू तिथे मी’ची नायिका, किती सोशिक, किती कुटुंबवत्सल, किती पतिव्रता आहे, तरीही तो सत्यजित छळतोय तिला. बरं तिला तो घराबाहेरही काढत नाही की घटस्फोटही देत नाही (तसं केलं तर मालिका संपेल नाही का?) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बायाबापडय़ा तिच्यावर होणाऱ्या अन्यायाने दु:खीकष्टी होतात, डोळ्यांना पदर लावतात आणि पुन्हा उत्कंठेने आज मंजिरीचा कोणत्या नव्या प्रकाराने छळ होणार, यासाठी उत्सुकतेने टीव्हीसमोर बसतात! किती गंमत आहे नाही, एखादी ट्रॅजेडीही किती उत्कंठावर्धक असू शकते! तर सांगायचं म्हणजे, या कथानकाची कल्पनाही स्वयंभू नाही.
काही महिन्यांपूर्वी संपलेल्या ‘कुंकू’चा तिच्यावर बराच ठसा आहे. नायक आणि नायिकेतील गैरसमज, त्यांच्यातील बेबनाव, त्यांनी नाइलाजाने चार भिंतीत एकत्र राहणे, घरातील खलनायिकांनी आगीत तेल ओतणे, कालांतराने या खलनायिकांची कारस्थानं उघड होणं, व्यावसायिक शत्रूंमुळे नायक अडचणीत येणे आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी नायिकेने खांद्याला खांदा लावून साथ देणे.. (हा शेवटचा प्रकार ‘तू तिथे मी’मध्ये अद्याप आलेला नाही, मात्र ते अटळ आहे) आता वेगळं काय उरलं, तुम्हीच सांगा! हॉटेलमधील बहुतांश भाज्यांमध्ये ज्याप्रकारे तेच मसाले आणि तीच ग्रेव्ही असते, फक्त नावं वेगळी असतात, तसाच हा प्रकार. या मालिकांमध्ये ‘उंच माझा झोका’ तुम्हालाही खूप वेगळी वाटत असेल, ही मालिका तर इतिहासावर आधारित आहे, तरीही त्यात महिला मंडळांचे (काल्पनिक) हेवेदावे आहेतच. घरातील अन्य ज्येष्ठ मंडळींचा स्त्री-शिक्षणाला विरोध असल्याने रमाबाईंना चार बुकं शिकण्यासाठी मोठं अग्निदिव्य करायला लागलं होतं. या मालिकेत आतापर्यंत तरी ते तीव्रतेने दाखवण्यात आलेलं नाही, पुढे कदाचित तसं दाखवलं जाईलही. मात्र एखादी मुलगी शिकू पहात्ये आणि त्यात तिला सासूमुळे अडचणी येतायत, ही कल्पना कोणत्याही मालिकेच्या कर्त्यां-करवित्यांना भुरळ घालणारीच. याच कल्पनेची नक्कल सध्या ‘दिल्या घरी तू सुखी रहा’मध्ये होताना दिसत आहे. अतिशय कर्तबगार, हुशार आणि कोणत्याही समस्येवर अक्सीर इलाज सांगणारी वृंदा (हीसुद्धा बिचारीच) कांता काकूंपुढे मात्र हतबल होते. तिच्या बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासात अडथळे आणण्यासाठी कांताकाकू काय-काय कारस्थानं रचतात, हे तुम्हीही पहात असालंच. (जाणार कुठे, समोर दिसतं ते पहावंच लागतं) आमची मालिका ‘उंच माझा’च्या आधीची आहे, यात आधीही वृंदाची परीक्षा हुकावी म्हणून कांताकाकूंच्या कुरापती दाखवण्यात आल्या आहेत, असा बचाव केला जाऊ शकतो. मात्र शिक्षणावरून रमाची होणारी ओढाताण रंगात आल्यानंतर इकडे कांताकाकूंनाही नवं बळ संचारलं आहे, हा योगायोग नाही.
असो, निखळ मनोरंजन होणार असेल तर अशा देवाण-घेवाणीस तुमचा-आमचा आक्षेप नसावा, मात्र यामुळे सृजनाचा प्रवाहच आटणार नाही, याची जबाबदार लेखक-दिग्दर्शकांनी काळजी घ्यायला हवी. त्यापेक्षाही जबाबदारी आहे, ती उपग्रह वाहिन्यांची.
या वाहिन्यांनी चांगल्या लेखक-दिग्दर्शकांना प्रोत्साहन देऊन प्रेक्षकांपुढे कसदार मालिका सादर करण्याची आवश्यकता आहे, तसे न घडल्यास एका लग्नाची तिसरी, चौथी, पाचवी गोष्ट येतच राहील!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा