दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. दहावी हा शिक्षणाच्या संधी चांगल्या मिळण्यासाठीचा पाया आहे. विद्यार्थ्यांचा हा पाया ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या उपक्रमामुळे पक्का होण्यास चांगली मदत होते. त्यामुळे ‘लोकसत्ता यशस्वी भव’ हा उपक्रम म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना यशाची नवी शिखरे पादाक्रांत करण्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायी ठरणारा उपक्रम आहे, असे मत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जनसंपर्क व कम्युनिटी सव्र्हिस बँकिंग विभागाचे सरव्यवस्थापक प्रशांत कुमार यांनी व्यक्त केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने घाटकोपर पूर्वेच्या पंतनगरमधील वनिता विकास हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी भव’च्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्या समारंभात बोलताना प्रशांत कुमार यांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी बँकेच्या जनसंपर्क व कम्युनिटी सव्र्हिस बँकिंग विभागाचे सहसरव्यवस्थापक एन. एस. मुळ्ये यांचेही भाषण झाले. दहावीचा अभ्यास मन लावून करा आणि परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून भावी आयुष्यात यशस्वी होण्याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वितरण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील वॉरियर, वनिता विकास हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृंदा निवरगी, खजिनदार नीता दातार, सचिव कविता देशमुख, शाळा व्यवस्थापनाचे सदस्य नमिता दातार व वंदना कोल्हटकर, दहावी इयत्तेला शिकविणारे सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री तोरसकर यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा