जिल्ह्य़ातील लोणार सरोवराचे ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक महत्व लक्षात घेता या परिसराचा जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व राष्ट्रीय विज्ञान केंद्र म्हणून भरीव विकास करण्यास केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. या परिसरातील लोकसभा, विधानसभा मतदारसंघाचे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची राजकीय इच्छाशक्ती यासाठी कमी पडत आहे. त्यामुळे विज्ञानाचे आधुनिक ज्ञानतीर्थ असलेल्या लोणारचा विकास एक मृगजळच ठरला आहे.
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, अवकाशयान विभाग, पुरातत्व विभाग, पर्यावरण विभाग राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय, वनविभाग व नगरविकास विभाग यांनी देखील या जागतिक ठेव्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या परिसराचे निवासी असलेले बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना गेल्या पाच वर्षांत लोणार सरोवर जागतिक आणि राष्ट्रीय पर्यटन व विज्ञान नकाशावर झळकविण्याची सुवर्ण संधी होती. मात्र, त्यांनी या संधीचे सोने न करता लोणार सरोवर उपेक्षितच ठेवले. जिल्ह्य़ाचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव व भाजपाचे खासदार हरिभाऊ जावळे यांनी आतापयर्ंत लोणार सरोवर विकासासाठी कुठलाही ठोस निधी उपलब्ध करून दिला नाही. बुलढाणा लोकसभेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांनी विशेष प्रयत्न करून लोणारला पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा मिळवून दिला. त्यानंतर एका याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून लोणार सरोवर जतन व संवर्धनाच्या उपाययोजना राबविण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला.
लोणार सरोवर हे राष्ट्रीय दर्जाचे ज्ञानविज्ञान केंद्र, तसेच जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र होण्यासाठी भौगोलिक, वैज्ञानिक, भूगर्भशास्त्रीय, खगोलशास्त्रीय नैसर्गिक पाश्र्वभूमी तयार आहे. मात्र, या पायाभूत परिस्थितीचा सर्वांगिण विकास आराखडा तयार करून तो राबविण्याची आवश्यकता आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी कालबध्द कार्यक्रम, लोणार सरोवर औरंगाबाद, अजिंठा, चिखलदरा या ठिकाणांना पर्यटकीयदृष्टय़ा जोडणे, लोणार परिसराचा पक्षी व प्राणी अभयारण्य म्हणून विस्तार व विकास, जंगल सफारीची व्यवस्था करणे, परिसरातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन, रमन विज्ञान केंद्र, भूगर्भ व खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा, लोणार तारांगण, विज्ञान वस्तूसंग्रहालय, खडक अभ्यास केंद्र, सरोवर अभ्यास केंद्र अशा अनेक उपाययोजना येथे करता येतील. लोणार अजिंठा व औरंगाबादला जोडून पर्यटनाचा सुवर्ण त्रिकोण तयार करू, अशा भरपूर वल्गना खासदार प्रतापराव जाधव यांनी केल्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत त्याला मूर्त स्वरूप आले नाही. त्यांनी हे विज्ञानाचे आधुनिक ज्ञानतीर्थ राष्ट्रीय व जागतिक नकाशावर झळकविलेच नाही. त्यामुळे लोणारचा विकास एक दिवास्वप्नच राहिले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा