शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीरसभा अमरावतीत मार्च महिन्यात पंधरवडय़ाच्या अंतरावर आयोजित होणे हा योगायोग असला, तरी या सभांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. उद्धव ठाकरे यांची सभा ९ मार्चला, तर राज ठाकरे यांची सभा २४ मार्चला येथील सायन्स कोअर मैदानावर होणार आहे. पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा अमरावतीचा पहिलाच दौरा असून राज ठाकरे यांच्या सध्या सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे काय भावना व्यक्त करतात, याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.
राज ठाकरे यांच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील जाहीरसभा चांगल्याच गाजल्या. येत्या १५ मार्चला नागपुरात आयोजित त्यांची जाहीरसभा रद्द झाली आहे. विदर्भात त्यांची एकमेव जाहीरसभा अमरावतीत आहे. जालन्याच्या सभेत त्यांनी पुण्यात येण्याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलेले जाहीर आव्हान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिलेला सबुरीचा आदेश आणि त्यानंतर तणाव दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी घेतलेला पुढाकार यामुळे राजकीय वातावरणही बदलून गेले आहे. अमरावतीच्या सभेत सिंचन घोटाळ्याविषयी विस्ताराने बोलण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे अमरावतीच्या सभेत ते कोणाला लक्ष्य करतात, याची उत्सूकता ताणली गेली आहे.
राज ठाकरे यांच्या जाहीर सभेआधी उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने त्याविषयी ते काय बोलणार, ही चर्चा आतापासून रंगली आहे. दोघांच्या सभेची तुलनाही नंतर होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांच्या सभा जंगी व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज ठाकरे यांचा हा दौरा ‘मत मांडण्यासाठी’ असल्याचे सांगितले गेले, तरी या निमित्ताने त्यांना निवडणुकीआधी विदर्भात शक्तीप्रदर्शन करायचे आहे, हा उद्देश लपलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या जाहीरसभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून सायन्स कोअर मैदान सज्ज करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अभिजीत अडसूळ, जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय बंड, माजी खासदार अनंत गुढे, महानगरप्रमुख दिगांबर डहाके यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नेते तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्या जाहीरसभेसाठी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, पप्पू उर्फ मंगेश पाटील, प्रवीण तायडे, चंदू पिंपळे, विठ्ठल लोखंडकार आदी स्थानिक नेते तयारीला लागले आहेत. दीड महिन्याआधी मनसेचे आमदार राम कदम आणि सरचिटणीस शिरीष सावंत यांनी जिल्हा मेळाव्यातून सभेची वातावरणनिर्मिती सुरू केली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीरसभा अमरावतीत यापूर्वी अनेक वेळा झाल्या, पण आता दोन बंधू अमरावतीतून काय संदेश देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना, मनसेचा अमरावतीत ‘लाँग मार्च’!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीरसभा अमरावतीत मार्च महिन्यात पंधरवडय़ाच्या अंतरावर आयोजित होणे हा योगायोग असला, तरी या सभांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. उद्धव ठाकरे यांची सभा ९ मार्चला, तर राज ठाकरे यांची सभा २४ मार्चला येथील सायन्स कोअर मैदानावर होणार आहे
First published on: 06-03-2013 at 03:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Long march in amravati by shivsena mns