विविध प्रकारच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी दीर्घकालीन नियोजन, उपाययोजना व धोरणे आखून ती प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांनी व्यक्त केले.
परभणी येथील सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्थेद्वारे शरद पवार अध्यासन या शोधपीठाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात झाले, त्यावेळी वळसे-पाटील बोलत होते. या प्रसंगी आमदार सतीश चव्हाण, कविवर्य ना. धों. महानोर, डॉ. साहेब खंदारे, प्रताप बोराडे, सुनीता धर्मराव आदी उपस्थित होते.
 वळसे पाटील पुढे म्हणाले, इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला प्रेरणा मिळते. समाजात विविध क्षेत्रांत अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या. या आदर्श व्यक्तींचे कर्तृत्व समाजासमोर येणे आणि नव्या पिढीने त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अनेकांच्या त्यागातून महाराष्ट्र उदयास आला आहे. देश संघटित राहण्यासाठी सर्वानीच एकोप्याच्या भावनेतून कार्य करणे गरजेचे आहे.
संस्था, समाज उभारणीचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण असून या संदर्भात सामाजिक विज्ञान व लोकसाहित्य संशोधन संस्थेद्वारे सिद्धांतात्मक बाबींचा अभ्यास करण्यात येत आहे.
हे नक्कीच कौतुकास्पद आहे. सामाजिक नेतृत्व म्हणजे काय हे यातून नव्या पिढीसमोर येईल व अशा प्रकारच्या अभ्यासाची आज गरजही असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
सुनीता धर्मराव यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास श्रोत्यांची उपस्थिती मात्र खूपच कमी होती. पाहुणे आल्यानंतरही मोजकेच श्रोते होते. अगदी दीप प्रज्वलनाच्या वेळी स्वत:च मेणबत्ती पेटवून दीप प्रज्वलन करण्याची वेळ वळसे-पाटील यांच्यावर आली होती.