अनारक्षित तिकीट खरेदीसाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून रेल्वेने स्मार्टकार्डने संचालित होणारे एटीव्हीएम (स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र) सुरू केले. मात्र, त्याचा प्रचार आणि किचकट प्रक्रिया यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद आहे. मुंबईसाठी कालबाह्य़ ठरलेल्या आणखी सहा एटीव्हीएम नागपूर रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहेत.
जवळच्या गावाला नियमित ये-जा असलेल्या प्रवाशांना तिकिटांच्या खिडकीवर लांब रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून रेल्वे एटीव्हीएमचा पर्याय दिला, परंतु त्यासाठी आवश्यक स्मार्टकार्ड आणि त्याचा वापर करून तिकीट खरेदीची प्रक्रिया किचकट वाटत असल्याने नागपूर विभागात डिसेंबर २०१३ पासून आजपर्यंत केवळ ४०० स्मार्टकार्डची विक्री झाली आहे. एटीव्हीएममधून १५० कि.मी. पर्यंतच्या प्रवासाकरिता तिकीट खरेदी करता येते. स्मार्टकार्डधारकांना प्रत्येक तिकीट खेरदीच्या वेळी दोन टक्के सवलत मिळते, परंतु त्यासाठी किमान १०० रुपये भरून स्मार्टकार्ड घ्यावे लागते. यातील ५० रुपये स्मार्टकार्डसाठी आणि उर्वरित ५० रुपये तिकीट खरेदीसाठी वापरता येतात. हे कार्ड रिचार्ज करता येते. या योजनेला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद आहे. नागपुरातून अनारक्षित तिकीटांवर नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या सरासरी १४ हजार आहे. मात्र, स्मार्टकार्डचा वापर करण्याची संख्या जेमतेम ४०० आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर बसण्यात आलेल्या एटीव्हीएम यंत्रावर कार्ड ठेवल्यानंतर ज्या स्थानकाकडे जायचे आहे त्याच्या नावावर नकाशात क्लिक करावे लागते. त्यानंतर ‘एकेरी किंवा परतीचे’ हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर तिकीट मिळते. अशाच प्रकारचे यंत्र मुंबईही आहेत. तेथील प्रवाशांनी ही सर्व प्रक्रिया खूप किचकट असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ‘हॉट की एटीव्हीएम’ विकसित करण्यात आले. काही रेल्वे स्थानकावर ते बसवण्यातही आले.
मुंबई ज्या यंत्राबद्दल वेळखाऊ आणि किचकट, अशी ओरड होत असताना नागपुरात प्रतिसाद नसताना आणखी सहा एटीव्हीएम आणण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकावर सध्या दोन एटीव्हीएम कार्यरत आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावरील आरपीएफ कार्यालयाजवळील अनारक्षित तिकीट केंद्रावर आणि पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे नवीन एटीव्हीएम बसविण्यात येणार आहेत.
मुंबईत कालबाह्य़ झालेल्या एटीव्हीएम प्रतिसाद नसूनही नागपुरात
अनारक्षित तिकीट खरेदीसाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून रेल्वेने स्मार्टकार्डने संचालित होणारे एटीव्हीएम (स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र) सुरू केले.
First published on: 20-01-2015 at 07:57 IST
TOPICSएटीव्हीएम
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Longer response to ticket vending machines in nagpur