एक वर्षांपूर्वी महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासासंदर्भात अनेक आव्हाने असताना वेगवेगळे विकास कामाचे प्रकल्प सुरू केले असून त्यामुळे देशभरात नागपूरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शहरात सुरू असलेल्या विकास कामांची देशभर चर्चा सुरू आहे. विकासाच्या दृष्टीने कुठलेही काम हाती घेतले तर त्याला काही वेळ द्यावाच लागणार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत शहराचा कायापालट होईल, असा विश्वास महापौर अनिल सोले यांनी व्यक्त केला.
महापौर म्हणून १२ मार्चला २०१२मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरात केलेल्या विकास कामासंदर्भात महापौर अनिल सोले म्हणाले, शहरात विकास कामाच्या संदर्भात अनेक अडचणी आहेत मात्र अडचणी घेऊन बसण्यापेक्षा प्रशासनाला आणि सत्तापक्षासहीत सर्व पक्षातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहरातील विकास कामाला गती कशी देता येईल यादृष्टीने प्रयत्न केले आहे.
नागपूर शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला आहे. इंडिया टुडे ग्रुपच्या पुरस्कारातही १ गुण कमी पडल्याने नागपूर शहर चेन्नई पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. देशाच्या अन्य शहरांमध्ये नागपूरच्या विकास कामांची चर्चा आहे. गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेले अनेक विकास प्रकल्प जवळपास पूर्ण करण्यात आले असून काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नागनदीच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पाला यावर्षी प्रारंभ करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएमच्या निधीची वाट पाहणार नाही. टप्याटप्याने अंबाझरी, पिवळी नदी आणि पोहरा नदीचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. ई गव्हर्नन्स प्रणाली अधिक लोकाभिमूख करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत त्यामुळे त्यांची या कामात मदत होणार आहे. लंडन स्ट्रीटच्या धर्तीवर शहरात ऑरेंज सिटी स्ट्रीटचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून महापालिकेला ५५० कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. या प्रकल्पाच्या निविदा बोलावून प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सोले म्हणाले. पटवर्धन मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचा प्रस्ताव लिजच्या कारणावरून रखडला आहे. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज यांची भेट घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांची वेळ मागणार आहे. प्रा. जोंगेद्र कवाडे यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली आहे. लिजचा विषय तातडीने मार्गी लावावा यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्याची तयारी असल्याचे प्रा. सोले म्हणाले.