गणेशोत्सव काळात तीन होर्डिग्ज लावण्याच्या दिलेल्या सवलतीचा गैरफायदा उचलत नवी मुंबईत ठिकठिकाणी होर्डिग्ज, बॅनर आणि कमानींनी शहर अक्षरश: विद्रूप करण्यात आले आहे. त्यात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाने भर घातली असून, नाईक यांनी अनेक वेळा आवाहन करूनही काही अतिउत्साह कार्यकर्त्यांनी नाईकांना खूश करण्यासाठी भलीमोठी होर्डिग्ज लावण्याची जणू काही स्पर्धा लावल्याचे चित्र आहे.
मुंबईतील बॅनरबाजीवर मुंबई उच्च न्यायालयाने मार्च महिन्यात कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यावेळी ७२ तासांत शहरातील होर्डिग्ज, बॅनर, कमानी उतरविण्याचे आदेश पालिकेला दिले गेले होते. त्यानंतर सहा महिने मुंबई काही प्रमाणात होर्डिग्ज मुक्त होऊ शकली होती. त्यानंतर पुन्हा या होर्डिग्जनी डोके वर काढले असून गणेशोत्सवाची संधी साधून मोठय़ा प्रमाणात होर्डिग्ज लावण्यात आली आहेत. त्याविरोधात गुरुवारी एका नागरिकाने जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने त्यासंदर्भात १९ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.
 मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतही ठिकठिकाणी होर्डिग्ज, बॅनर, आणि कमानींनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. कमानींसाठी रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत असल्याची गंधवार्ताही मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाही. नवी मुंबईतील बहुतेक मंडळे ही विविध राजकीय पक्षांच्या पंखाखाली आहेत. त्यांनी या संधीचा फायदा घेऊन खूप मोठय़ा प्रमाणात कमानी आणि होर्डिग्ज लावलेल्या आहेत. पालिकेच्या एका निर्णयानुसार सार्वजनिक उत्सव काळात तीन होर्डिग्ज व कमानींना परवानगी न घेता लावण्याची सवलत देण्यात आलेली आहे. त्याचा फायदा उचलून अनेक मंडळांनी संपूर्ण रस्ता काबीज केलेला आहे. एका सेक्टरमध्ये चार ते पाच मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा विडा उचलल्याने या कमानी व होर्डिग्जचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात रविवारी १५ सप्टेंबर रोजी नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पालकमंत्री गणेश नाईक यांचा वाढदिवस असल्याने या होर्डिग्जमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने एक रस्ता, कोपरा, मोक्याचे ठिकाण असे नाही की ज्या ठिकाणी गणेश नाईक यांच्या छायाचित्रासह कार्यकर्त्यांचा फोटो असलेले होर्डिग नाही. गणेश नाईक यांनी अनेक वेळा कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस अशाप्रकारे साजरा न करता विधायक कामांनी साजरा करण्यात यावा असे स्पष्ट केले आहे, पण नाईकांच्या आपण किती जवळ आहोत हे दाखविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने नवी मुंबईत एकतरी होर्डिंग लावले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवी मुंबई गणेशमय झाल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाकडे यासंदर्भात चौकशी केली असता, होर्डिग, बॅनर, कमानी लावण्याची एकाही मंडळाने परवानगी घेतलेली नाही, असे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा