एस. टी. महामंडळाने जिल्ह्यातील ३५७ गावांच्या बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील मुख्य साधन असलेल्या खासगी वाहतुकीचा पोलीस प्रशासनाकडून आर्थिक कोंडमारा केला जात आहे. अवैध वाहतुकीच्या नावाखाली वाहनधारकांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला.
जिल्हाभरातील अनेक गावांत एस. टी. महामंडळाच्या बसेस जात नाहीत. ज्या गावांत बस जात होत्या, अशा ३५७ गावांतील बसेस महामंडळाने बंद करण्याचे ठरविले आहे. ग्रामीण भागातील जनतेला प्रवास करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा गावांमध्ये वाहतुकीची सोय करणारी खासगी वाहतूक व्यवस्था आता मात्र अडचणीत आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी बेरोजगारीवर उपाय म्हणून वाहनांची खरेदी करून उदरनिर्वाहासाठी खासगी वाहतूक सुरूकेली. परंतु पोलिसांनी या वाहतुकीला अवैध असे नाव देत त्रास देण्यास सुरुवात केली. वाहनधारकांकडून महिन्याकाठी ठराविक रकमेसोबतच अन्य वेळेसही मोठय़ा प्रमाणात लूट केली जात आहे. ग्रामीण भागाची दळणवळणाची गरज भागवणाऱ्या खासगी वाहतुकीला पोलीस प्रशासन नाहक त्रास देत आहे. परभणी शहरातूनही अनेक गावांमध्ये ही वाहतूक सुरू असते.
ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांकडून शहरातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसह इतरही पोलीस वरिष्ठांच्या नावाने वसुली करीत आहेत. यात नवा मोंढा ठाण्याचे कर्मचारी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. या ठाण्यातील वाहनचालकही आता वसुलीत मागे-पुढे पाहात नाहीत, असा आरोप केला जातो. मात्र ही सर्व लूटमार थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष माणिक कदम, गजानन तुरे, केशव आरमळ, बाळासाहेब कदम, करण बोबडे, शेख जाफर, मो. तकी, शे. आयुब, दिगंबर पवार, महादेव पवार, आनंद चव्हाण, गजानन दुधाने यांच्या सहय़ा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा