ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाचा असल्याची बतावणी करून दोन भामटय़ांनी ठाणे महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या भामटय़ांचा शोध सुरू केला आहे.
कोपरी येथील तपोवन सोसायटीत अशोक गंगाराम शिंदे (४४) राहात असून ते महापालिकेच्या अतिक्रमण विभागात काम करतात. गेल्या शुक्रवारी सायंकाळी अशोक शिंदे काही कामानिमित्त नगरसेवक संजय मोरे यांना भेटण्यासाठी गेले होते. वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर परिसरात एका भामटय़ाने त्यांना अडविले आणि ओळखले नाहीस का?, असे विचारले. तसेच गणेश नाईक यांचा भाचा असून पाटील नाव आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर त्या भामटय़ाचा मित्रही तेथे आला. या दोन्ही भामटय़ांनी त्यांना बोलण्यात गुंतविले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट, अंगठय़ा असा सुमारे दोन लाख ३० हजारांचा ऐवज काढून रुमालात ठेवला. त्यानंतर हा रुमाल बॅगेत ठेवण्याचा बाहाणा करून भामटय़ांनी हातचलाखीने लंपास केला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader