स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या अंदोरा शाखेतून (तालुका कळंब) ११ लाख ४५ हजार ११० रुपयांची रोकड चोरटय़ांनी लांबविली. गॅस कटरच्या साहाय्याने बँकेतील तिजोरी फोडून ही लूट करण्यात आली. प्रजासत्ताकदिनी हा प्रकार उघडकीस आला. कळंब शहरातच अन्य एका घरफोडीत ६७ हजारांचा ऐवज लुटण्यात आला.
सुमारे चार हजार लोकवस्तीच्या अंदोरा गावात स्टेट बँक ऑफ हैदराबादची शाखा आहे. शनिवारी बँकेला दुपारनंतर सुटी होती. दुपारी तीनच्या सुमारास कर्मचारी बँक बंद करून निघून गेले. त्याच रात्री चोरटय़ांनी बँकेच्या समोरील शटर उचकटून कुलूप तोडले. बँकेतील लोखंडी तिजोरी गॅस कटरने तोडून तिजोरीतील ११ लाख ४५ हजार ११० रुपयांची रोकड हातोहात पळविली. बँकेचे शटर उचकटलेले असल्याचे शाखा व्यवस्थापक प्रकाश देशपांडे यांच्या सकाळी निदर्शनास आले. त्यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला. याच दिवशी गावातील शेतकऱ्यांच्या वीजमोटारीही चोरीस गेल्याचे अनेकांनी सांगितले.
कळंब शहरात घरफोडी
कळंब शहरात शनिवारी रात्री चोरटय़ांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व ६७ हजारांची रोकड असा मुद्देमाल लांबविला. मार्केट यार्ड भागातील विष्णू मंडाळे हे कुटुंबीयांसह लग्नकार्यासाठी नाशिकला गेले होते. घरात कोणीच नसल्याचे पाहून चोरटय़ांनी डाव साधला.