तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या वसाहती मधील सहा बंद घरांच्या दरवाजांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरटय़ांनी ४ ते ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. रविवारी मध्यरात्री या चोऱ्या झाल्या. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडया, रस्ता लूट अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
कामगार सांस्कृतीक भवनासमोर विखे कारखान्याच्या अधिकाऱ्यांची वसाहत असून रविवारची सुट्टी असल्याने काही अधिकारी आपल्या कुटुबियांसमवेत घर बंद करुन गावाकडे गेले होते. या संधीचा चोरटय़ांनी फायदा घेवून वसाहतीधील पोपट सखाराम उंबरकर यांच्या घरातून चोरटय़ांनी १३ ते १४ तोळे सोन्याचे दागिने, तसेच भागवत खर्डे यांच्या घरातील ४ ते ५ तोळे दागिने व ८ हजारांची रक्कम, शिवाजी खर्डे यांच्या घरातील ८ हजार रुपये व प्रफुल्ल वावसे यांच्या घरातील किरकोळ रक्कम असा एकुण ४ ते ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. अन्य दोन घरांमध्ये चोरटय़ाच्या हाताला काहीच लागले नाही. सकाळी शेजाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली. घटनास्थळी भेट देऊन लोणी पोलिसांनी पंचनामा केला. भागवत खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरुध्द गुन्हा दाखल केला असून नगर येथून आलेल्या श्वानपथकाने प्रवरा डाव्या कालव्याच्या नेहरु पुलापर्यंत माग काढला.
लोणी पोलीसांनी घटनेचे गांभीर्य कमी करण्यासाठी सहा घरे फुटलेली असताना केवळ भागवत खर्डे यांचीच फिर्याद घेऊन त्यामध्ये ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद केली आहे. लोणी पोलीस हद्दीत अनेक घरफोडय़ा, चोऱ्या, भगवतीपुर पतसंस्थेतील ६० ते ७० लाखांची लूट, पत्रकार विकास अंत्रे यांना अज्ञात चोरटयांनी रीव्हालवरचा धाक दाखवून त्यांची केलेली लूट, बाळासाहेब राऊत खुन प्रकरण, तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसाहतीमध्ये सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन केलेल्या घर फोडय़ा आदी गुन्ह्यंचा तपास लावण्यात लोणी पोलीसांना अपयश आले आहे.
सहा घरे फोडून पाच लाखांची लूट
तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या वसाहती मधील सहा बंद घरांच्या दरवाजांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरटय़ांनी ४ ते ५ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. रविवारी मध्यरात्री या चोऱ्या झाल्या. लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडया, र
First published on: 09-04-2013 at 01:23 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looted 5 lakh cracked of 6 houses