मित्राच्या मदतीने प्रेयसीलाच लुटण्याचा प्रकार विटय़ानजीक रेवणगाव घाटात घडला असून, सांगली पोलिसांनी प्रियकरासह तिघांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.
कलढोण (ता. खटाव) येथील शरद दिनकर गुदावले (२४) हा प्रेयसी संगीता नारायण साळुंखे (४०) हे युगुल विटय़ानजीक रेवणगांव घाटात दि. १ जानेवारी रोजी बोलत बसले असताना दोघांनी येऊन चाकूचा धाक दाखवून २ मोबाइल, सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी असा ३३ हजाराचा माल लुटून नेला होता. या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा शरद गुदावले याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी पोलिसांना फिर्यादीवरच संशय बळावला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढून फिर्यादीचे मित्र सूरज ऊर्फ गोटय़ा राजेंद्र जाधव (२५) आणि शाहरूख जब्बार पठाण (१९) दोघे रा. करमाळा, जि. सोलापूर यांना ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली देत यामागील मुख्य सूत्रधार फिर्यादी शरद गुदावले असल्याचे सांगितले. या घटनेत फिर्यादी स्वत: चाकूहल्ल्यात जखमी झाला होता. मित्राच्या मदतीने प्रेयसीला लुटण्याचा डाव पोलिसांनी उघडकीस आणून चाकू, मोबाइल, सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. दोघा मित्रांना मंगळवारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, शरद गुदावले याला उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.