*  पावसाचा द्राक्ष व  गव्हाला सर्वाधिक फटका
*  नुकसानीचे सर्वेक्षण सुरू
सोमवारी अचानक गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नाशिक, देवळा व कळवण तालुक्यात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. कुठे द्राक्षमण्यांना तडे गेले तर, कुठे गहू व मक्याचे हाताशी आलेले पीक आडवे झाले. पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, ढकांबे परिसरातही द्राक्षबागांसह कांद्याला वादळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला चारा मोठय़ा प्रमाणात ओला झाल्याने तो सडण्याची शक्यता आहे. शहादा, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातही पावसाने पिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने पावसाचा फटका बसलेल्या भागांत सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू केले असून नुकसानीचा आकडा कोटय़वधीच्या घरात जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेती वाचविण्यासाठी आधीच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कसरतींचा सामना करावा लागत असताना बेमोसमी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यात सर्वाधिक ३९ मिलीमीटर, तर त्या खालोखाल नाशिक तालुक्यात २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कळवण १७, सिन्नर सात, चांदवड सहा मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण दोन ते १५ मिलीमीटरच्या दरम्यान राहिले. संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी लक्षात घेतल्यास देवळा, नाशिक व कळवण तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याचे लक्षात येते. या आधारावर कृषी विभागाने मंगळवारी सकाळपासून सर्वेक्षणाचे काम हाती घेतल्याची माहिती कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांनी दिली.
वादळी पावसाचे स्वरूप एकदम वेगळे होते. मखमलाबादमध्ये पावसाचा तडाखा बसत असताना शहराच्या दुसऱ्या बाजूस म्हणजे पाथर्डी व परिसरात तो रिमझिम स्वरूपात होता. आडगाव, विल्होळी व पाथर्डी परिसरात गारपिटीचा लवलेश नसताना गारपिटीमुळे नाशिक तालुक्यातील काही भागात प्रचंड नुकसान झाले. मखमलाबाद, दरी-मातोरी परिसरातील बागांमध्ये पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे गेले. संतोष काकड व दत्तात्रय काकड यांच्या अनुक्रमे दोन व अडीच एकर द्राक्षबागेत हेच चित्र पहावयास मिळाले. उभयतांच्या बागेतील द्राक्ष काढणीचे काम सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने काढलेल्या मालासह बागेतील घडांना तडाखे बसले. कित्येक बागांमध्ये घड गळून पडले. द्राक्षबागेचे जवळपास ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी ‘नाशिक वृत्तान्त’ला सांगितले. मंगळवारी सकाळपासूनच त्यांना गळालेले मणी वेचण्याचे काम करावे लागले. याच परिसरातील सोमनाथ तिडके यांचा कापणीवर आलेला गहू पूर्णत: आडवा झाला. गव्हाचे पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना देवळा व नाशिक तालुक्यात संपूर्ण शेती भूईसपाट झाली. ढगाळ वातावरण तयार झाले असले तरी पाऊस लगेच येईल याचा अंदाज शेतकऱ्यांना आला नाही. परिणामी काढणी केलेला शेतीमाल पावसात सापडला. तो सुरक्षित ठिकाणी नेण्याइतपतही उसंत मिळाली नसल्याची हतबलता तिडके यांनी व्यक्त केली.
गारपिटीचा परिणाम द्राक्षांच्या घडावर होतो. पावसामुळे पानांवरील धूळ घडावर उतरून मण्यांच्या फुगीरपणाला अडथळा ठरते. ढकांबे, पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, देवळा व नाशिक तालुक्यात द्राक्ष, गहू व कांद्याचे मोठे नुकसान झाल्याचे बागायतदार संघाचे नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष विजय गडाख यांनी सांगितले. कांदा व मक्यासही पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे कांद्याची पात मोडून त्याची वाढ खुंटण्यात परिणाम होईल. पावसाचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात विशिष्ट काही भागापुरतेच मर्यादित राहिल्यामुळे तुलनेत कमी भागास त्याचा फटका सहन करावा लागल्याचे मत कृषी अधिकारी पन्हाळे यांनी व्यक्त केले. प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिकप्रमाणे नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाने हजेरी लावली. जळगावमध्ये रात्री नऊ वाजेनंतर दोन तास पाऊस सुरू होता. उशिरा पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस लाभदायक असल्याचे सांगितले जाते. बेमोसमी पावसामुळे आंब्याला आलेला मोहोर नष्ट होणे, दादर, गहू, हरबरा पिकांची प्रत खालावणे
आणि उत्पन्नात घट याप्रकारे हानी होणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा