सातारा जिल्ह्यात गेल्या पावणेदोन महिन्यांतील सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, या पाच तालुक्यांतील एकूण साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होताना ६६ पशुधन दागावले. महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील ११२ घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झाली. हे एकंदर नुकसान १०४ कोटींचे असून, त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. सर्वप्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला अतिवृष्टीचा तडाखा बसला असताना दुसरीकडे मात्र, अपेक्षित पावसाअभावी कायम दुष्काळी जनता हवालदिलच आहे. अपेक्षित पाऊस झाला नसल्याने माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यांत बहुतांश क्षेत्रावर पेरण्याच झालेल्या नाहीत. तर अतिवृष्टीमुळे सातारा, पाटण, वाई, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांतील काही क्षेत्रावर पेरण्या झालेल्या नाहीत. पेरण्या झालेली पिकेही अतिवृष्टीमुळे वाया जाण्याची नैसर्गिक परिस्थिती ओढावली आहे.
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन, भुईमूग, भात, संकरित ज्वारी या पिकांना बसला आहे. सततच्या संततधारेमुळे पाटण तालुक्यातील ३७३० हेक्टर, वाई २५०, महाबळेश्वर ७८०, जावळीतील ३२८८, खंडाळा तालुक्यातील ५४६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यातील २३४ गावे, वाई तालुक्यातील २१ गावांतील १,१४६, महाबळेश्वर तालुक्यात शंभर गावातील ३,६७६, तर खंडाळा तालुक्यातील ३१ गावांतील १,१२७ शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांच्या एकूण नुकसानीपैकी २,५१२ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्केपेक्षा जादा, तर ६,०८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील ५३३ शेतक-यांच्या शेताच्या ५८५ ताली वाहून गेल्या. या नुकसानीची रक्कम सुमारे ३ लाख रुपये आहे. तर, पाटण तालुक्यातील एक शाळकरी मुलगी पुरात वाहून गेली आहे, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र भुईमूग, इतर कडधान्ये, संकरित ज्वारी, भात, बाजरी या पिकांखालील ३१,४७५ हेक्टरवरील क्षेत्र नापेर राहिले आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील १५, ९६५, जावळी ५,७१०, माण ६,४०१, सातारा २,२६४, वाई ७८४, महाबळेश्वर २९०, खंडाळा ६१हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी व खंडाळा या पाच तालुक्यांत सततच्या जोरदार पावसाने सोयाबीन, भुईमूग, भात, संकरित ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीच्या तडाख्यात ६६ जनावरे दगावल्याची अधिकृत आकडेवारी आहे. परंतु, पाटण तालुक्यात १४ म्हशी वाहून जाण्याबरोबरच कोयना धरण पाणलोटक्षेत्र व त्यालगतच्या विभागात तसेच दुर्गम, डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे तब्बल पाचशेवर पशुधन मृत्युमुखी पडले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत व भर पावसात मृत्युमुखी पडलेली जनावरे दाखवा असा लालफितीचा सवाल नुकसानीचे पंचनामे करणा-या महसूल अधिकारी व कर्मचा-यांनी केला आहे. परिणामी, वस्तुस्थिती स्पष्ट असतानाही बेसुमार पावसाने पशुधन दगावलेल्या शेतक-यांवर अन्याय होणार आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही पक्ष, संघटना अथवा सामाजिक कार्यकर्ता पुढे येत नसल्याची बाब खेदजनक असल्याचे मानले जात आहे.

Story img Loader