डाकले वाणिज्य महाविद्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून पुणे विद्यापीठाकडे वेळेत अर्ज सादर न झाल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. पूर्वीच्या चुकीचा फटका बसलेला असतानाही महाविद्यालयाने यंदाचेही अर्ज विलंबानेच दाखल केले आहेत.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक व बुध्दिमान विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठ शिष्यवृत्ती देते. डाकले महाविद्यालयाने २०१०-२०११ व २०११-२०१२ या वर्षांतील शिष्यवृत्तीचे अर्ज विद्यापीठाच्या वित्त विभागाकडे उशिरा दाखल केले. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता थकीत शिष्यवृत्ती दिली जाणार असून, अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली आहे. महाविद्यालयाने विद्यापीठातून शिष्यवृत्तीची यादी आणली नाही, त्यामुळे मंजूर होऊनही संबंधित रकमा मिळालेल्या नाही. चालू वर्षी २०१२-२०१३ या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले, तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एकलव्य शिष्यवृत्तीचे अर्ज ३० सप्टेंबर २०१२ पर्यंत दाखल करायचे होते. महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांनी अर्ज मुदतीत केले, पण ते विद्यापीठाकडे व्यवस्थापनाने पाठविलेच नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते की नाही याबद्दल खात्री वाटत नाही. बोरावके महाविद्यालयाने वेळेत विद्यापीठाकडे अर्ज केले, त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमा मिळाल्या. पण डाकले महाविद्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला.
राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असलेल्या महाविद्यालयातील एका कर्मचा-यामुळे हा मनस्ताप सहन करण्याची वेळ विद्यार्थ्यावर आली आहे. हा कर्मचारी कुणालाही जुमाणत नाही त्यामुळे प्राचार्यासह प्राध्यापकही हतबल झाले आहेत.
आठवडाभरात शिष्यवृत्ती
पुणे विद्यापीठाकडून काही विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती आली आहे. धनादेश काढण्याचे काम सुरू आहे. काही विद्यार्थ्याच्या खात्यावर रकमा जमा झाल्या आहेत. आपण स्वत: विद्यापीठात गेलो होतो. येत्या आठ-दहा दिवसांत शिष्यवृत्ती मिळेल असे प्राचार्य संजय कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा