ब्रिटिशांनी या देशात दोनशे वर्षे राज्य केले, त्यातून काही तरी शिकण्यापेक्षा सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्षांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. यातून सत्तेतील आघाडय़ांत वाढ होत आहे. मात्र, अशा राजकीय आघाडय़ांमुळे तत्त्वहीनता जोपासली जात असल्याची खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांनी व्यक्त केली.
यूजीसी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) यांच्या वतीने औसा तालुक्यातील किल्लारी येथे शहीद भगतसिंग महाविद्यालयात दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. त्याचे उद्घाटन आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते झाले. समाजप्रबोधन अकादमीचे डॉ. विठ्ठल मोरे अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, भाकपचे सचिव डॉ. भालचंद्र कांगो, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, सुधाकर शिंदे, उत्तम सूर्यवंशी, सरपंच किरण बाभळसुरे उपस्थित होते.
डॉ. नाकाडे म्हणाले की, ज्यांना पक्षाचे महत्त्व, एकत्रीकरण कळत नाही तो माणूस पक्ष काढतो. अशा राजकीय पक्षाचा समाजाला काय उपयोग? अशा पक्षातून आलेले आघाडीचे सरकार जनतेच्या कोणत्या फायद्याचे आहे? यातून फक्त घराणेशाही पुढे येत असून वडिलांनंतर मुलगा, मुलगी, जावई, सून असे प्रकार राजकारणातून समोर येत आहेत. या देशाची काय दशा केली? हे कोणी केले? खरे तर हे आपणच केले आहे. दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सरकारमध्ये दोन पक्षांपेक्षा एकाच पक्षाचे सरकार असेल तरच प्रशासनावर पकड मजबूत होते व मतदारांनाही त्याचा चांगला फायदा होतो. अनेक पक्षांचे मिळून सरकार सत्तेत आले तर एकीकडे महात्मा गांधींचा फोटो लावून दुसरीकडे दारूविक्रीचा परवाना काढणाऱ्या नेतेमंडळींचे चित्र दिसून येते. अशा अनेक पक्षांच्या राजकीय सरकारचा समाजाला कोणता फायदा होणार आहे? अशा आघाडी सत्तेतील एका पक्षाचे नेते उपोषणाला बसतात, तर दुसरे टीका करतात, हे काय आहे? हे कसले राजकारण? असा रोकडा सवाल त्यांनी केला.
आमदार पाटील म्हणाले की, एका विचाराचे सरकार असणे देशाच्या, राज्याच्या हिताचे आहे. परंतु देशाला महासत्तेकडे व विकासाकडे घेऊन जाण्यासाठी एका पक्षाचे सरकार असणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाचे धोरण स्थिर सरकार देण्यासाठी अधिक चांगले असल्याचे गेल्या ५० वर्षांच्या राजकारणातून दिसून येते.
पहिल्या सत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व २०१४ च्या निवडणुकीतील आघाडीची भूमिका काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी मांडली. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या राजकारणात डाव्या पक्षाची भूमिका भाकपचे सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी मांडली.
उद्या (शनिवारी) शिवसेना प्रवक्तया नीलम गोऱ्हे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेते शिवसेना-भाजप-रिपाइं आघाडी २०१४ चा पर्याय ठरू शकेल काय, याचा परामर्श घेणार आहेत.

Story img Loader