शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या लाल्या रोगाच्या अनुदानाची रक्कम महसूल प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. जिल्हा सहकारी बँकेत शेतकऱ्यांची खाती असतानाही वैजापूर तालुक्यात अनुदानाची रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे देण्यात आली. ही रक्कम देताना सात-बारा उताऱ्यावरील नावे देण्यात आली. यादी मराठीत व धनादेश मात्र इंग्रजीमध्ये टाईप केल्यामुळे नवेच गोंधळ निर्माण झाले. काही लोकांची आडनावेच लिहिली नाहीत, तर काहींची नावे चुकविली. दिवाळीच्या तोंडावर चार पैसे हातात आले तर किमान थकलेले वीजबिल तरी भरता येईल, अशा आशेवर असणारा शेतकरी या प्रकारामुळे धास्तावला आहे.
दुष्काळासाठी दिलेली रक्कमही याच प्रकारे आयसीआयसीआय बँकेकडे वळविली होती. त्याला शेतकऱ्यांचा विरोध होता. खासदार रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे या अनुषंगाने आंदोलनही केले. दुष्काळी निधीपाठोपाठ लाल्या रोगामुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम राज्य सरकारकडून मिळाली. परंतु प्रशासकीय अनागोंदीमुळे ती पोहोचू शकली नाही. या अनुषंगाने तलाठी, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी स्तरावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांनी चौकशी केली असता, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
वैजापूर तालुक्यातील शेतकरी मात्र या गोंधळामुळे वैतागले आहेत. सुधाकर रामचंद्र देशपांडे यांच्या नावे लाल्या रोगाच्या अनुदानापोटी ४ हजार २०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यांचा मुलगा सदाशिव सुधाकर एवढेच नाव लिहिले गेले. आडनाव नसल्यामुळे त्यांना रक्कम काढता आली नाही. विशेष म्हणजे सुधाकर देशपांडे आज हयात नाहीत. त्यांचे २००७ मध्येच निधन झाले. त्यांच्या तीन वारसदारांची नोंद सात-बाऱ्यावर आहे. त्यामुळे देण्यात आलेल्या याद्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सात-बाऱ्यावर मराठी नाव, आडनाव आणि इतर शब्द असतात. काही धनादेशाद्वारे इतर असेही लिहून आल्याने नवाच पेच निर्माण झाला आहे. हा प्रश्न लवकर निघाला नाही तर दिवाळीत आंदोलन करू, असा इशारा गुरुवारी देण्यात आला.

Story img Loader