मराठी चित्रपटांमध्ये खूप निरनिराळ्या विषयांचे चित्रपट काढले जात असले तरी हिंदीची कॉपी करण्याबरोबरच गोष्ट मांडण्याच्या पद्धतीमधील बटबटीतपणा दाखविणारे चित्रपटही अधूनमधून येत असतात. ‘पावर’ या चित्रपटाचा विषय चांगला असूनही मध्यंतरानंतर चित्रपट भरकटत जातो आणि कथानकात जिथे नेमके नाटय़-संघर्ष आहे ते न दाखविताच चित्रपट संपतो, त्यामुळे खटकतो. दिग्दर्शक-लेखकांच्या भरकटण्यामुळे प्रेक्षकही भेलकांडतो. कारण त्याच्या हाती काहीच लागत नाही.
कनिष्ठ मध्यमवर्गीय प्रामाणिक तरुणाला नोकरीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून नोकरीवरून काढून टाकले जाते. त्या धक्क्याने त्याचा मृत्यू होतो. त्याची बायको गौरी पाखरे (निशा परुळेकर) आपल्या नवऱ्यावर ठेवलेला ठपका खोटा आहे हे पटवून देण्यासाठी नवऱ्याच्याच जागेवर नोकरीसाठी प्रयत्न करते. ते प्रयत्न करताना तिला काही राजकारण्यांची मदत घ्यावी लागते. परंतु, मदत करण्याऐवजी धृपतराव चोपणे (नागेश भोसले) राजकारणी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी गौरीचा दहा-बारा वर्षांचा मुलगा तिथे पोहोचतो आणि त्या राजकारण्यावर चाकूने हल्ला करतो. मग मायलेक दोघे पळून जातात. राजकारण्याला धडा शिकवितात.
अतिप्रसंग करणाऱ्या राजकारण्यावर हल्ला केल्यानंतर मध्यंतर होते तेव्हा प्रेक्षकाला आता पुढे काय होणार याची उत्कंठा लागते. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगावर संघर्ष करून मात करण्याचे नायिका ठरविते खरे. पण राजकारण्याला धडा कसा शिकविते तेच चित्रपटातून वगळले आहे. त्याऐवजी मुलाला घेऊन गौरी पळून जाते. हल्ला केल्याबद्दल आपल्या मुलाला पोलीस पकडणार म्हणून ती गावोगाव भटकते. हे सयुक्तिक वाटले तरी चित्रपटाच्या शीर्षकानुसार मध्यवर्ती व्यक्तिरेखेचा संघर्ष आणि राजकारणी, व्यवस्था यावर तिने केलेली यशस्वी मात हे दाखविणे अपेक्षित होते. याउलट राजकारणी लोक या घटनेचा फायदा कसे घेतात, दोन प्रतिस्पर्धी राजकारणी एकमेकांवर कशी कुरघोडी करतात यावर दिग्दर्शकाने भर दिलाय. कथानकाची एक बाजू म्हणून राजकारण्यांचे फायदा उपटण्यासाठी वागणे दाखविणे चुकीचे नसले तरी चित्रपटाचे शीर्षक आणि मध्यवर्ती व्यक्तिरेखा यांना वाव देणे सयुक्तिक ठरले असते.
गौरी पाखरे राहत असलेल्या भागातील नगरसेवक चढय़ा (विजय पाटकर) याचीही तिच्यावर नजर आहे. सत्तेतील पुरुषांचा स्त्रीलंपटपणा हा एक कोन कथानकात आहे. त्याचा कथानकात, संवादांमधून वापर दिग्दर्शकाने केला आहे. विनोदाच्या अंगाने विजय पाटकर यांनी संवादफेकीतून, हावभावातून साकारलेला नगरसेवक हंशा पिकविणारा आहे. नागेश भोसले यांनी साकारलेला धृपतराव चोपणे हा स्त्रीलंपट पण बेरक्या राजकारणी चांगला साकारला आहे. निशा परुळेकरची गौरी पाखरे प्रभावी ठरत नाही. कारण कथानकात या व्यक्तिरेखेला फारसा वाव दिलेला नाही. शीर्षकामध्ये ‘पॉवर’ऐवजी पावर का म्हटलेय ते कुठेच स्पष्ट होत नाही.
डीआरटू फिल्म्स निर्मित  ‘पावर’
निर्माते- धनजी पटेल, दिनेश चौधरी, नीता भारती, दिग्दर्शक- विजय राणे, कथा-पटकथा-संवाद – राजू मेश्राम, संगीत – आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे, छायालेखन – राजा फडतरे, कलावंत – निशा परुळेकर, विजय पाटकर, नागेश भोसले, उदय टिकेकर, अनंत जोग, बालकलाकार श्रेयस परांजपे, प्रतीक्षा जाधव व अन्य.
गौरी पाखरे (निशा परुळेकर), आमदार धृपतराव चोपणे (नागेश भोसले), चढय़ा (विजय पाटकर).  

Story img Loader