हरसुल जनसुनवाई
अशा कर्मचाऱ्यांची कामकाजाची बिकट स्थिती, आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची अंगणवाडी सेविकांशी अरेरावी, रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून निधीचा होणारा अपव्यय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत असणारी रिक्त पदे आदी समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी जनसुनवाईदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर वाचला. आरोग्य सेवेवर लोकाधारित देखरेख प्रक्रिया अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वचन सामाजिक संस्थेच्या वतीने हरसुल येथे आयोजित जनसुनवाईत आरोग्य सेवेशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांचा पट पुढे आला.
या वेळी ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गठित केलेल्या रुग्ण समितीचा फलकदेखील अद्याप लावण्यात आलेला नाही. तसेच रुग्णसेवा किंवा संदर्भसेवेबाबत तक्रार नोंदविण्यासाठी तक्रारपेटी लावलेली नाही. खरशेत उपकेंद्राची असणारी दुरवस्था, चिरपाली आणि सावरपाडा येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून या ठिकाणी एम. पी. डब्ल्यू. सेवक, परिचारिका यांच्यासह आशाची पदे रिक्त आहेत. या शिवाय, खरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तसेच जननी-शिशू सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थीना अनुदान मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्ण-कल्याण निधींतर्गत ग्रामस्वच्छता, आरोग्य, पोषण आहार आणि पाणीपुरवठा या कामांवर वापरण्यात येणाऱ्या निधीचे योग्य नियोजन नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवत असल्याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. याविषयी तालुका वैद्यकीय अधिकारी व्ही. आर. जोशी यांनी तक्रार पेटी व फलक पुढील आठवडय़ात बसविण्यात येईल, असे नमूद केले. रिक्त पदांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. सध्या ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हरसुल, ठाणापाडा, तोरंगण येथे ३ एम.पी.डब्ल्यू., खरशेत येथे एक ए.एन.एम., ठाणापाडा येथे निरीक्षकाच्या दोन, ठाणापाडा येथे तीन शिपाई, वाहनचालक यांची अद्याप प्रतिनियुक्ती करण्यात आलेली नाही. शासनाच्या आदेशानुसार आदिवासी भागातील रिक्त पदे भरण्यात येणार असून अन्य पदांबाबत काहीच सांगता येत नसल्याचे जोशी यांनी सांगितले. आशाच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव मागविण्यात आले असून १५ एप्रिलपर्यंत येणाऱ्या अर्जाची छाननी करून नियुक्ती करण्यात येणार आहे. कल्याण निधीच्या योग्य नियोजनाबाबत समितीची बैठक घेऊन अग्रक्रमाने आपल्या गरजा लक्षात घेऊन निधी वापरावा, अशी सूचनाही जोशी यांनी केली. खरशेतच्या आरोग्य केंद्राबाबत खास तरतूद म्हणून काही निधी राखीव ठेवण्यात आला असून संदर्भ सेवेसाठी त्या ठिकाणी २४ तास रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. काही गंभीर केसेस असल्यास नाशिक किंवा हरसुल रुग्णालय येथे पाठविण्यात येते. अंगणवाडी सेविकांशी ज्या संबंधित अधिकाऱ्याने हुज्जत घातली, अपशब्द वापरले त्या अधिकाऱ्याला पुढील बैठकीत जाहीर माफी मागण्याचा आदेश देण्यात येणार आहे. जनसुनवाईच्या बैठकीस वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, माजी सभापती सुनंदा भोये, खरशेतच्या सरपंच गीता राऊत, चिरापालीच्या सरपंच अनुसया कोनजे आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवेशी संबंधित तक्रारींचा पाऊस
अशा कर्मचाऱ्यांची कामकाजाची बिकट स्थिती, आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची अंगणवाडी सेविकांशी अरेरावी, रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून निधीचा होणारा अपव्यय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत असणारी रिक्त पदे आदी समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी जनसुनवाईदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर वाचला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-03-2013 at 11:41 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots complaints against health services